पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०६ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

करीत आहों. सत्तालोभाने प्रेरित होऊन पक्षीय स्वार्थासाठी श्रेष्ठ तत्त्वांना वाटेल तो हरताळ फासण्यास आपले शास्ते नित्य सिद्ध असतात. ते मुस्लिम लीगशी सहकार्य करतात, गणतंत्र परिषदेशी हातमिळवणी करतात, भांडवलवाल्यांच्या पुढे नमतात ! तत्त्वांच्या बाबतींत तडजोड, मुरड सर्व सर्व त्यांना मंजूर आहे. इतकेंच नव्हे तर तत्त्वभ्रष्टेतेचे उदात्त समर्थन हि करण्यास काँग्रेसच्या नेत्यांची तयारी असते. केरळ-प्रकरणापासून मुस्लिम लीग ही जातीय नाही असें ठरत आहे. त्यामुळे हैदराबाद, मुंबई येथे पुन्हा या संघटनेचें उत्थापन सुरू झाले आहे. याचे परिणाम अत्यंत घातक होतील हें कोणालाहि स्पष्ट दिसून येईल, पण काँग्रेसला तें दिसणार नाही. गणतंत्र परिषद् पूर्वी प्रतिगामी होती, पण सत्ता टिकविण्यासाठी तिच्या सहकार्याची आवश्यकता आहे असें दिसतांच काँग्रेसच्या दृष्टीने तिचें प्रतिगामित्व नष्ट झालें, आणि आता तिच्याविरुद्ध व मुस्लिम लीगविरुद्ध बोलावयाचें नाही हें पथ्य पाळण्यास काँग्रेसची सिद्धता आहे ! मुंबई- गुजराथचें द्वैभाषिक मागे भारताच्या हिताचें होतें, आता तें अहिताचें ठरलें आहे. असे हे राजकारणाचे, तत्त्वच्युतीचे खेळ येथे रोज चालत असतांना राष्ट्रीय स्वार्थासाठी कोणी तशा तऱ्हेचा सल्ला दिला तर मात्र थोर तत्त्वांची भाषा बोलून आपले नेते त्यांचा उपहास करतात. म्हणजे परराष्ट्रीय राजकारणांत नसली तरी अंतर्गत पक्षीय राजकारणांत आपली दृष्टि पूर्ण वास्तववादी आहे !

आपली निष्पक्षता सर्वांना अमान्य

 पण आपलें परराष्ट्रकारण स्वतंत्र, पक्षातीत, निष्पक्ष असें ठेवून आपल्याला प्रत्यक्ष फलप्राप्ति काय होते ? तर जगांत ज्या देशांवर अन्याय होईल, ज्यांच्यावर साम्राज्यवाद्यांचे आक्रमण होईल, अत्याचार होतील, त्या देशांच्या बाजूने आपल्याला सहानुभूतीच्या फक्त घोषणा करतां येतात ! या पलीकडे कांहीहि करण्याचे सामर्थ्य आपल्याजवळ नाही. लष्करी सामर्थ्य नाही, धनसामर्थ्य नाही, वाक्सामर्थ्य फक्त आहे ! पण त्याचा दलितराष्ट्रांना कसलाहि उपयोग होत नाही. १९५० साली चीनने तिबेटवर सैन्य पाठवून त्याचें स्वातंत्र्य नष्ट केलें. त्या वेळी भारताने चीनचा जोराने निषेध केला. पण, 'तुमचा यांत कसलाहि संबंध नाही. हा अंतर्गत