पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१० : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

आहे. अशा या कॉलेजांतून प्रवेश मिळणे ही रशियांत महद्भाग्याची गोष्ट समजली जाते. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या जीवनाची सर्व कक्षाच बदलून जाते. समाजाच्या वरच्या श्रेणींत त्यांना निश्चित स्थान मिळते. त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन जाते. त्यामुळे घरांतील मुलांना विद्यापीठांत प्रवेश मिळाल्याचें कळतांच त्या घरांत मोठा आनंदोत्सव होतो.
 रशियामध्ये निरक्षरता जवळजवळ नष्ट झालेली आहे. आज तेथे एकंदर दोन लक्ष तेरा हजार शाळा असून एकंदर आठ भाषांत शिक्षण चालतें. ताझिकिस्तानमध्ये १९१९ साली सात शाळा असून विद्यार्थी १२४ होते. आज तेथे २५०० शाळा व साडेतीन लक्ष विद्यार्थी आहेत. उझबेकिस्तानमध्ये ४० वर्षांपूर्वी शे. २ लोक साक्षर होते. आज तेथील पदवीधरांचें प्रमाण फ्रान्सच्या दुप्पट आहे.
 ही सर्व माहिती देऊन जॉन गुंथूर यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणतात, 'या सर्व शिक्षणाचा उपयोग काय ? हे विद्यार्थी म्हणजे केवळ आज्ञाधारक यंत्रच नव्हत काय ? त्यांच्या विषयाबाहेर विद्यार्थ्यांना कसलेंहि ज्ञान नसतें. ते मिळविण्याची त्यांना परवानगीच नाही. बाह्य जगाची अत्यंत विपर्यस्त व असत्य माहिती त्यांना पुरविली जाते. ती त्यांना निमूटपणें स्वीकारावी लागते. विरोध करण्याचा, स्वतंत्र विचार करण्याचा प्राथमिक हक्कहि त्यांना नाही. मग या शिक्षणाचा उपयोग काय,' असा प्रश्न उद्भवतो. तो प्रश्न मांडून गुंथूर यांनीच त्याचें उत्तर दिले आहे. ते म्हणतात की 'एवढ्यामुळे सोव्हिएट रशियांतील शिक्षणाचे महत्त्व कमी लेखणें युक्त नाही. आज विज्ञानाचे शिक्षण घेतलेला एक मोठा वर्ग तयार होत आहे. शास्त्रीय रीतीने विचार करण्याचें शिक्षण त्याला दिले जात आहे. हा वर्ग पुढील काळीं स्वतंत्र विचारशक्ति प्राप्त करून घेईल यांत शंका नाही. वेंडेल विल्की यांची स्टॅलिनशीं मुलाखत झाली त्या वेळीं स्टॅलिनने त्यांना रशियांतील शिक्षणाची माहिती दिली. त्या वेळी विल्की म्हणाले, "स्टॅलिनसाहेब, जरा जपूनच असा. या शिक्षणप्रसारामुळेच एखादे दिवशी आपण पदच्युत होण्याचा संभव आहे." पंडित जवाहरलाल नेहरू यांनीसुद्धा सोव्हिएट शिक्षणपद्धतीला फार मोठें प्रशस्तिपत्र दिले आहे. जगांतील सर्वोत्कृष्ट पद्धत असा तिचा गौरव