पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

सार्वजनिक जीवनांतून धर्माला स्थानभ्रष्ट केलें आहे. यामुळे विज्ञानपूत, बुद्धिवादी, विवेकनिष्ठ अशा धर्मशिक्षणाची आपल्या जनतेची भूक भागविण्याची येथे सोयच नाही. त्यासाठी नव्या धर्मसंस्था लोकांनी उभारणें अवश्य आहे. महाराष्ट्रांतल्या खेडोपाडी श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीज्ञानेश्वर, श्रीतुकाराम यांचीं मंदिरें उभारण्यांत आली आणि तेथे नव्या पद्धतीने भूतांचे पालन, कंटकांचें निर्दळण, प्राणिमात्रास सुखदान, अनाथांच्या काजा साह्य होणें, ज्यासी अपंगिता नाही त्यासी हृदयीं धरणें या धर्माचा प्रत्यक्ष आचार करण्याचें शिक्षण मिळाले तरच लोकशाहीला अवश्य ती धर्मक्रान्ति येथे घडून येईल. मात्र या नव्या धर्माच्या प्रवचनांत संसार, स्त्रीपुत्र, समृद्धि, लक्ष्मी, ऐहिक वैभव, विज्ञान, बुद्धिवाद, तर्कनिष्ठा, यांची चुकूनसुद्धा हेटाळणी होता कामा नये. या सर्वांचा परिपोष करील व तो भगवंताच्या अधिष्ठानावरून करील अशाच धर्माची आता येथे आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे जातिधर्मनिरपेक्ष सर्व समाजाची सेवा हेंच याचें धोरण असले पाहिजे. 'हें विश्वचि माझे घर' हा श्रीज्ञानेश्वरांचा संदेश प्रत्यक्ष आचरणांत आणणारीं धर्ममंदिरें प्रत्येक खेड्यांत स्थापन झाली तरच अवश्य तो धर्मक्रान्ति येथे घडून येईल. या मंदिरांनी चालविलेली रुग्णालय, क्रीडामंदिरें, शाळा, औद्योगिक केन्द्रे यांत सर्वांना प्रवेश असला, सर्वांचे तेथे स्वागत झालें, त्यांनी सर्वांची सेवा केली आणि मानवधर्माचें उंच ध्येय डोळयांपुढे ठेविलें तर मिशनऱ्यांनी स्थापिलेल्या संस्थांना जगांत सर्वत्र जसें यश आले तसें या मंदिरांनाहि येईल. आपल्या खेड्यांमध्ये सध्या डॉक्टर, वकील, इंजिनियर, बागाइतदार, सहकारी पतपेढ्यांचे व्यवस्थापक असे समाजावर वर्चस्व असणारे अनेक व्यवसायांतले लोक असतात. त्यांनी या बाबतीत पुढाकार घेऊन सामाजिक पुण्याची प्राप्ति करून देणाऱ्या या धर्माच्या प्रसारासाठी संस्था उभारल्या, त्यासाठी स्वतःला वाहून घेतलें तर भारतांत थोडक्या अवधीत फार मोठे धर्मपरिवर्तन घडून येईल आणि रशियाने दण्डसत्तेने जे सामर्थ्य, जे बल प्राप्त करून घेतलें तें भारताला प्राप्त होईल. लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान आहे तें हेंच आहे. रशियाप्रमाणे विज्ञाननिष्ठा लोकांत बाणली पाहिजे, शब्दप्रामाण्य नष्ट झाले पाहिजे, समाजसेवेचें शिक्षण प्रत्येक तरुणाला मिळालें पाहिजे. राष्ट्रासाठी प्रत्येकाने सर्वस्वत्याग करावा ही