पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सहावें : १९७

विवाहसंस्कार व जातकर्महि चर्चमध्येच करतात. (स्टडी ऑफ यूं. एस्. एस्. आर.- ऑगस्ट १९५७) या सगळ्याचा परिणाम असा होत आहे की, रशियांत धर्मभावना नष्ट होत नाहीं तर ती पश्चिम युरोपांतल्याप्रमाणे विज्ञानपूत, बुद्धिवादी, इहलोकनिष्ठ व सामाजिक पुण्याची चिंता वाहणारी अशी होत आहे. हीच धर्मक्रान्ति भारतांत घडवून आणण्याचे पराकाष्ठेचे प्रयत्न आपल्या सरकारने करणें अवश्य होतें, पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रनिष्ठेच्या जोपासनेची जशी त्याने अक्षम्य हेळसांड केली तशीच धर्मभावनेच्या जोपासनेचीहि केली. दोन्ही बाबतींत कारणपरंपरा मात्र तीच आहे. यामुळे यापुढेहि भारत सरकार असले कांही प्रयत्न करील ही आशा नाही.
 पण जुन्या धर्मसंस्थांनी किंवा सरकारने काहीहि प्रयत्न केले नाहीत तरी भारताच्या लोकशाहीची चिंता असणाऱ्या भारतीयांनी या कार्यासाठी नव्या संस्था निर्माण केल्या पाहिजेत. नवे धर्मपंथ स्थापिले पाहिजेत. मेथॉडिस्ट, क्वेकर इ. पंथांचा इतिहास आपण पाहिला तर त्यांनी जरी प्रत्यक्षांत केवळ धर्मक्रान्तीचेंच उद्दिष्ट ठेविलें असले तरी ती क्रान्ति सामाजिक व राजकीय क्रान्तीला पोषक झाली, आणि लक्षावधि दलित जनतेच्या जीवनाला प्रतिष्ठा प्राप्त झाल्याने या क्रान्तीमुळेच युरोपांत लोकशाहीचा पाया घातला गेला हे आपल्या ध्यानांत येईल, आणि भारताची लोकसत्ता समर्थ व बलाढ्य करण्यासाठी येथेहि तशीच कान्ति घडविण्याची प्रेरणा आपल्याला होईल. मोठ्या संस्था स्थापन होण्यास वेळ लागेल, पण त्यासाठी थांबून राहण्याची मुळीच आवश्यकता नाहीं. ज्याला या धर्माची प्रेरणा होईल त्याने आपल्या लहानशा परिसरांत प्रारंभीं सांगितलेल्या अल्बिनो, बटरवर्थ, टालव्हास, फादर क्लेटन यांच्याप्रमाणे धर्ममंदिर उभारून त्यांच्याच पद्धतीने कार्याला प्रारंभ केला पाहिजे. सध्या आपल्या समाजांत धार्मिक जीवन व इतर जीवन यांची फारकत झाली आहे. शिक्षणामध्ये धर्माला अग्रस्थान असावयास पाहिजे. सांस्कृतिक कार्यक्रमांत नव्या धर्माची शिकवण दिली पाहिजे. नव्या मानसशास्त्रज्ञांनी रोगमुक्ततेसाठी धर्मभावनेची, ईशप्रार्थनेची फार आवश्यकता आहे असें सांगितल्यामुळे इंग्लंडमध्ये प्रत्येक रुग्णालयांत आतां धर्मोपाध्यायांची योजना झालेली आहे, म्हणजे त्याहि क्षेत्रांत धर्मसंस्कारांची आवश्यकता आहे; पण इतर धर्मीयांच्या भावना दुखवतील म्हणून आपण