पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९६ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

ठरल्यावांचून राहणार नाही. रशियाचें धर्म मुळांतच नष्ट करण्याचें धोरण कोणाला पटो वा न पटो पण सोव्हिएट रशियांतील अंध, हेकट, दुराग्रही, राष्ट्रविरोधी, विज्ञानविरोधी धर्मभावना तेथील नेत्यांनी सगळ्याच जमातींतून समूळ खणून काढली आहे यांत शंकाच नाही, आणि यामुळे रशियाचें बळ शतपटीने वाढले आहे याबद्दलहि दुमत होईल असे वाटत नाही. शतकानुशतकें शब्दप्रामाण्यवादी अंध धर्माला कवटाळून असलेल्या जमातीच्या प्रदेशांचे तीस चाळीस वर्षांत औद्योगीकरण करून टाकण्यांत, त्या जमातींना अज्ञानयुगांतून विज्ञानयुगांत ओढून आणण्यांत सोव्हिएट नेत्यांना जें अभूतपूर्व यश आले आहे त्याचें बरेचसें श्रेय त्यांच्या इतर अनेक तत्त्वांप्रमाणे या धर्मकारणालाहि देणें अवश्य आहे. रशियांतील धर्मनाशाच्या प्रयत्नांचा विचार करता एक गोष्ट स्पष्ट दिसून येते की, सोव्हिएट नेते अखिल जनतेची मनःक्रांति घडवून आणण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न करीत आहेत. धर्मभावना नष्ट करीत असतांना त्या मनांत विज्ञाननिष्ठा रुजविली पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असतो. १९५७ च्या मेमध्ये 'शास्त्रीय निरीश्वरवादा'ची मॉस्को येथे परिषद भरली होती. तिच्यापुढे झालेलीं भाषणें वाचलीं की, हे अगदी स्पष्ट होईल. 'पाव्हलाव्हचे सिद्धान्त' 'फिजिक्समधील जडवाद व अध्यात्मवाद' 'पृथ्वीवरील जीवोत्पत्ति' 'जीवनशास्त्रांतील द्वंद्व' या तऱ्हेचे निबंध तेथे वाचले गेले, आणि शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराने अंध धर्मश्रद्धा नष्ट करावी या धोरणाचा पुरस्कार केला गेला. कारण जुलमी साधनांनी दडपशाही करून धर्मश्रद्धा कधीच नष्ट होणार नाही हे आता रशियन नेत्यांनी चांगलेच जाणले आहे. त्यामुळे धर्मगुरूंच्या व जनतेच्या धर्मभावना दुखवावयाच्या नाहीत असा सक्त दंडक तेथील शास्त्यांनी घातलेला आहे. विज्ञानावरील ग्रंथ, पत्रके, व्याख्याने, प्रवचनें यांचा पाऊस पाडून जनतेला विज्ञानवादी व बुद्धिवादी बनवावयाचें असें धोरण त्यांनी आता आखलें आहे, यामुळे लोक विज्ञानवादी होत आहेत यांत शंका नाही. पण त्यांची धर्मभावना अणुमात्र कमी होत नाही. १९५४ साली सरकारच्या असें ध्यानांत आले की सरकारी सायन्स ॲकॅडमीतच धर्मनिष्ठ लोक आहेत. एवढेंच नव्हे तर कॉमसोमॉल या कम्युनिस्ट तरुणांच्या संघटनेचे सभासदहि जोराने धर्मभावनेकडे वळत आहेत. ते चर्चमध्ये प्रार्थनेला जातात, आणि