पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सहावें : १९५

युरोपांत जशी धर्म क्रान्ति घडवून आणली तशी येथे घडवून आणण्याच्या कार्याला वाहून घेतले पाहिजे. समर्थांच्या कार्याचें विवेचन करतांना प्रा. माटे यांनी म्हटले आहे की, रूढ अर्थाने समर्थांनी राजकारण केलें नसेल. पण सर्व राजकारणाचा पाया जो प्रवृत्तिधर्म त्याचा उपदेश त्यांनी केला, जनमनांत त्या दृष्टीने क्रान्ति केली, हेंच त्यांचें खरें राजकारण होय. या दृष्टीने हिंदुत्ववादी संस्थांनी भारतांत जर इष्ट ती धर्मक्रान्ति घडवून आणली तर तें खरें श्रेष्ठ राजकारण होईल.
 भारत हें निधर्मी राष्ट्र आहे. याचा अर्थ इतकाच की, येथले शासन निधर्मी आहे, म्हणजे तें कोणत्याहि एका विशिष्ट धर्माविषयी पक्षपात दाखवीत नाही. खरें पाहतां भारतांतल्या सर्व धर्मीयांच्या धर्मभावनेचा परिपोष करण्याची चिंता वाहणें हें भारताच्या शासनाचें कर्तव्य आहे. पण एकंदर धर्मभावनेविषयी उदासीन राहणें येवढीच आपल्या शासनाची दृष्टि आहे. वास्तविक आर्थिक, सामाजिक व राजकीय क्रान्ति घडवून आणणें हें जसे सरकारचें कर्तव्य आहे त्याचप्रमाणे भारतातल्या सर्व समाजांत धर्मक्रान्तीला चालना देणें हेंहि सरकारचें कर्तव्य आहे. पण सध्याचे सरकार हे कधीहि करणार नाही. कारण मुसलमानांच्या धर्मभावना दुखवतील अशी येथल्या शास्त्यांना भीति आहे. राष्ट्रनिष्ठेची जोपासना करणें हा तर या युगाचा धर्म आहे, पण परधर्मीयांच्या भीतीने- भीति इतकीच कीं, ते निवडणुकीत मतें देणार नाहीत- काँग्रेसच्या नेत्यांना आपल्या महनीय पूर्वपरंपरेचा अभिमान भारतीयांच्या चित्तांत बिंबविण्याचें धाडसहि करवत नाही. मग धर्माचा प्रश्न तर आणखीच नाजूक आहे. तेव्हा हे निवडणूकनिष्ठ लोक मुसलमान, ख्रिस्ती या समाजांत धर्मक्रान्ति घडवून आणण्याचा विचार स्वप्नांतहि करणार नाहीत. निवडणूकनिष्ठेमुळे त्या विधर्मी समाजांत प्रयत्न नाही आणि निधर्मी व्रतामुळे हिंदुसमाजात नाही. असें हें काँग्रेसचें धर्मकारण आहे. खरें पाहतां धर्मप्रचारापासून अलिप्त राहण्याचें धोरण कटाक्षाने संभाळल्यानंतर प्रत्येक समाजांत वर सांगितल्या प्रकारची धर्मक्रान्ति घडवून आणण्यासाठी भारत सरकारने प्रचंड प्रयत्न करणें अवश्य आहे. शब्दप्रामाण्यवादी, केवळ परलोकनिष्ठ, अंध, विज्ञानविरोधी अशी धर्मभावना भारतांत कोणत्याहि समाजांत दृढावून राहिली तरी ती राष्ट्रसंघटनेला व लोकशाहीला घातक