पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९४ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

प्रगति साधावयाची आहे, ४० कोटी लोकांना साक्षर करावयाचें आहे; आळशी, मंद, अंध, अशा लोकांना १२, १४, १६ तास काम करावयास शिकवावयाचें आहे, सहकारी संस्थांचें जाळे विणावयाचें आहे, योजना यशस्वी करावयाच्या आहेत, नद्या अडवावयाच्या आहेत, वाळवंटे भिजवावयाची आहेत, डोंगर फोडावयाचे आहेत, पर्वत उचलावयाचे आहेत, आणि हे सर्व व्यक्तिस्वातंत्र्य न हिरावतां, गोळी न घालता, कॉन्सेन्ट्रेशन कँप न उघडतां साधावयाचें आहे. प्राध्यापक लास्कीप्रमाणेच आपणहि ध्यानीं घेतलें पाहिजे की, "मोठी कार्ये साधण्यासाठी धर्मनिष्ठाच अवश्य आहे "; आणि लोकशाहीला पोषक अशी धर्मनिष्ठा येथे निर्माण व्हावयाची तर वर वणिलेल्या युरोपातल्या धर्मक्रान्तीसारखीच धर्मक्रान्ति भारतांत झाली पाहिजे. धर्माने केवळ मोक्षच मिळतो असें नाही तर श्रेष्ठ, धर्माला अविरोधी असे जे अर्थकाम तेहि प्राप्त होतात हें भारतीयांनी जाणणें हीच ती धर्मक्रान्ति होय.
 पण अशी धर्मक्रान्ति येथे कशी घडविणार हा मोठाच प्रश्न आहे. खरे म्हणजे वारकरी संप्रदाय, रामदासी संप्रदाय, शंकराचार्यांचीं पीठे, इतर अनेक संतमहंतांची पीठे, जुन्या देवस्थानांचे, मठांचे अधिकारी यांचें हे काम आहे. गेल्या पन्नास वर्षांत या संस्थांमध्ये नवीन पदवीधर, पाश्चात्त्य विद्या-विभूषित, सुशिक्षित अशा अनेक लोकांचा प्रवेश झाला आहे. त्यांतील कित्येक तेथे मोठ्या अधिकारपदांवर आहेत. पण धर्म हे सामाजिक पुण्य आहे, केवळ मोक्षकार्य नाही, अनाथ, अपंग, बहिष्कृत, पतित, रंजले गांजले यांच्या योगक्षेमासाठी, त्यांच्या ऐहिक उत्कर्षासाठी, त्यांच्यावर होणारे अन्याय दूर करण्यासाठी, आपण संस्था उभारल्या पाहिजेत, त्यांना संघटित केलें पाहिजे, आणि या सेवेंतून श्रीभगवद्गीतेचा, ज्ञानेश्वरांचा, तुकाराम- महाराजांचा संदेश त्यांच्या मनावर ठसविला पाहिजे, अशा तऱ्हेची जाणीव सुद्धा या लोकांना नाही. मग तसे प्रयत्न त्यांच्या हातून होणें लांबच राहिलें. हिंदुमहासभा, जनसंघ, वर्णाश्रमस्वराज्य संघ यांची कहाणी वर सांगितलीच आहे. या तर सर्व अर्वाचीन संस्था आहेत. राष्ट्रसेवेसाठी, ऐहिक उत्कर्षासाठी, अभ्युदयासाठीच त्या निर्माण झाल्या आहेत. माझें तर असें मत आहे की, निवडणुकीचें, सत्तेचें राजकारण पूर्णपणे सोडून देऊन त्यांनी गेल्या तीनशे वर्षांत मेथॉडिस्ट, क्वेकर, साल्व्हेशन आर्मी, इ. ख्रिस्ती धर्म पंथांनी