पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सहावें : १९३

पार पाडता येणार नाहीत हे सोव्हिएट नेत्यांनी कृतीने तरी मान्य केलें आहे: आज रशिया व त्याचे अंकित देश येथे प्रवास करून येणारे निरीक्षक तर एकमुखाने सांगतात की, तेथील नेत्यांचा तत्त्वतः धर्माला कितीहि विरोध असला तरी जनतेमध्ये धर्मभावना वाढीलाच लागलेली दिसते. धर्मनिष्ठेचा संपूर्ण नाश झाला पाहिजे असें तत्त्वज्ञान मात्र कम्युनिस्ट नेते तोंडाने सांगत असतात. त्यासाठी कोणत्या उपायांचा अवलंब करावा याची चर्चा करण्यासाठी गेल्या चाळीस वर्षांत २५-३० तरी परिषदा झाल्या असतील, पण अजून याविषयी धोरण निश्चित झालेलें नाही. कारण कोणताच उपाय यशस्वी होत नाही, आणि तो होणारहि नाही. कारण जरा आपत्प्रसंग आला की, कम्युनिस्ट नेते धर्मनिष्ठेची स्वतःच जोपासना करतात.
 भारताला पुढच्या कांही वर्षांत महाकार्यं साधावयाचें आहे. अतिमहाकार्य, अगदी दुष्कर, अघटित असें कार्य साधावयाचें आहे. स्वातंत्र्यप्राप्ति हे कार्य कांहीच नव्हे इतकें तें ध्येय दुःसाध्य आहे. आपल्याला लोकशाही सिद्ध करावयाची आहे. हें कार्य किती दुर्घट आहे हें आवतीभोवती दृष्टि टाकली तर सहज कळून येईल. गेल्या पंचवीस वर्षांत आशिया खंडांत ज्या लोकसत्ता प्रस्थापित झाल्या त्या आपल्या डोळ्यांदेखत कोलमडून पडत आहेत. ब्रह्मदेश, ईजिप्त, इराक, इंडोनेशिया, पाकिस्तान, तुर्कस्थान येथल्या लोकसत्ता पत्यांचे बंगले कोसळावे तशा कोसळत आहेत. पण येवढ्यानेच हें भागत नाही. ज्या युरोपपासून आपण लोकसत्तेची तत्त्वें घेतली तेथेहि असाच प्रलयकंप चालू आहे. जर्मनी, इटली, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया येथल्या लोकसत्ता हिटलर-मुसोलिनींनी उधळून दिल्या. आता त्यांच्यावर सोव्हिएट रशियाची काळी छाया पसरली आहे. त्यांतून कोणी थोडा सावरत आहे तो लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचें आदिपीठ, यांचें माहेरघर जें फ्रान्स तेथेच लोकशाहीला ग्रहण लागलें आहे. अजून तें खंडग्रास आहे. पण केव्हा खग्रास होईल त्याचा नेम नाही. असा कल्पान्त सर्वत्र दिसत असतांना आपण आपली लोकसत्ता यशस्वी करणारच अशी प्रतिज्ञा केली आहे. लास्कीने आपल्या 'रिफ्लेक्शन्स' या ग्रंथांत इंग्लंडच्या भवितव्याविषयी विवेचन करतांना म्हटले आहे की, "मोठी कार्ये साधण्यासाठी धर्मनिष्ठेसारखी निष्ठाच अवश्य आहे, आणि ती तर आपणांजवळ सध्या नाही." भारताला आज बेकारी नष्ट करावयाची आहे, समृद्धि निर्माण करावयाची आहे, औद्योगिक
 लो. १३