पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९२ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

आहेत. हिंदुस्थानसारख्या इतर देशांतल्या कम्युनिस्टांना स्वदेशद्रोही बनविण्यापुरतीच आंतरराष्ट्रीयता त्यांनी शिल्लक ठेवली आहे. धर्माच्या बाबतींत अजून इतकें परिवर्तन झालेलें नाही हें खरें; पण धर्माचरणाला व धर्मप्रसाराला प्रारंभी जितका कम्युनिस्ट नेत्यांचा विरोध होता तितका आता राहिलेला नाही. त्या प्रारंभीच्या काळांतहि रशियन जनतेची धर्मनिष्ठा अणुमात्र कमी झालेली नव्हती. सिडने वेबने म्हटले आहे की, रशियनांना लेनिन, स्टॅलिन हे पूज्य वाटत; पण मध्ये ख्राइस्ट, एका बाजूला लेनिन व दुसऱ्या बाजूला स्टॅलिन अशी चित्रे लावून ते तिघांची पूजा करीत असत. आता तर घटनेनेच प्रत्येकाला पूर्ण धर्मस्वातंत्र्य दिलेलें आहे. त्या अन्वयें ख्रिस्ती, मुसलमान, ज्यू, बौद्ध सर्वांचे धर्मसंस्कार त्यांच्या त्यांच्या धर्मग्रंथाप्रमाणे होतात, त्यांच्या उपासना त्यांच्या धर्ममंदिरांत चालतात आणि पूर्ण धर्मनिष्ठ, ईश्वरनिष्ठ नागरिकांना आता इतरांप्रमाणेच मताधिकार आहे.
 पण महत्त्वाची गोष्ट अशी की, युद्धासारखी आपत्ति आली की, कम्युनिस्ट लोक राष्ट्राच्या याच प्रेरक शक्तीला आवाहन करतात. हिटलरचें आक्रमण येणार असें १९३४-३५ साली दिसूं लागतांच मार्क्सवादाच्या शिळोप्याच्या गप्पा संपल्या व रशियाने राष्ट्रनिष्ठेची जोपासना करण्यास प्रारंभ केला आणि प्रत्यक्ष युद्ध सुरू होतांच कम्युनिस्ट नेत्यांनी जनतेच्या धर्मभावनेला आवाहन करण्यास सुरुवात केली. सर्व जुनीं मंदिरें खुली करण्यांत आली. सहस्रसंख्येने लोक प्रार्थनेला जमूं लागले. मंदिरांत पूजासाहित्य सरकार पुरवू लागलें. पूर्वीच्या काळी धर्मनिष्ठेमुळेच रशियाला मोठमोठे जय मिळाले असें कम्युनिस्ट नेतेहि लिहूं बोलूं लागले. धर्म ही अफूची गोळी कोणी म्हणेल तर त्यालाच आता गोळी बसेल असा मनु पालटला. नोव्हेंबर १९४२ मध्ये सेरेजी व सुलेव्ह या धर्मगुरूंचे स्टॅलिनने जाहीरपणें आशीर्वाद घेतले आणि तें वृत्त प्रवदा पत्रांत छापण्यांत आलें. निरीश्वरवाद, नास्तिक्य हें कम्युनिस्ट पक्षाचें (मार्क्स प्रणीत) प्रिय तत्त्व; पण त्याच्या प्रचारास बंदी घालण्यांत आली. धर्म ही प्रतिगामी शक्ति नसून रशियाने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यापासून त्याची सारखी प्रगतिच होत आहे असें रशियन सरकारी इतिहासकार आता सांगू लागले. (मॉरिस हिंडस : मदर रशिया) याचा अर्थ असा की, धर्मनिष्ठा ही फार मोठी प्रेरणा आहे, तिच्यावांचून महान् कार्ये मानवाला