पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सहावें : १९१

आणि ही ईर्षा नसल्यामुळे दिवसांतून बारा, चौदा, सोळा तास काम करावें ही ऐपतच भारतीयांच्या अंगी कधी आली नाही. आज गरज आहे ती अशा अविश्रांत कष्टाची आहे. जर्मनी, जपान हीं राष्ट्रे महायुद्धानंतर अगदी रसातळाला गेलीं होतीं, पण आठ दहा वर्षांच्या अवधींतच त्यांनी पूर्वीच्या दसपट समृद्धि निर्माण केली आहे. अखंड, अहोरात्र, अविरत कष्ट हेंच त्यांच्या उन्नतीचें रहस्य आहे, याविषयी जगांत दुमत नाही. असे कष्ट भारतीयांच्या रक्तांतच नाहीत. वैयक्तिक, परलोकनिष्ठ, मोक्षवादी धर्मामुळे आपले रक्तच पांगुळले आहे. शेतकऱ्याला दुप्पट जमीन दिली तर कष्ट निम्मे करून तो पहिल्या पातळीवरच राहतो, आणि दिल्लीचा सरकारी अधिकारी वरची श्रेणी मिळतांच ऑफिसांत निम्मा वेळच येतो. दुप्पट ज़मीन, दुप्पट पगार हे येथे दुप्पट श्रमाला प्रेरणा देत नाहीत, तर आळस, निरुद्योग, हीन विलास हे त्यांतून निर्माण होतात. आपले शब्दप्रामाण्य, आपला दैववाद व आपली मोक्षदृष्टि हीं या अनर्थाच्या बुडाशीं आहेत.
 आपली धर्मदृष्टि आमूलाग्र बदलल्यावांचून शेकडो वर्षे आपल्या हाडींमांसीं खिळलेले हे दोष नाहीसे होणार नाहीत, आणि ते नाहीसे झाल्यावांचून लोकशाहीला अवश्य तें कर्तृत्व येथे निर्माण होणार नाही. आपण लोकशाहीचे पुरस्कर्ते आहोत, त्यामुळे तर या धर्मक्रान्तीची येथे फारच आवश्यकता आहे. दण्डसत्तांकित देशांची गोष्ट थोडी निराळी आहे. दण्डसत्ता म्हणतांच प्रामुख्याने आज रशिया व चीन हीं राष्ट्र डोळ्यांसमोर येतात. तेथे धर्म ही अफूची गोळी मानली जाते, धर्म हा समाजाचा शत्रु मानला जातो. पण या राष्ट्रांच्या बाबतींत कांही ऐतिहासिक निर्णय करतांना फार जपून विचार केला पाहिजे. धर्मनिष्ठेप्रमाणेच राष्ट्रनिष्ठाहि मार्क्सवादाला निषिद्ध वाटत असे; आणि पहिल्या उत्साहाच्या भरांत रशियांतील धुरीणांनी राष्ट्रनिष्ठेचाहि नायनाट करण्याचा प्रयत्न केला होता. आपापल्या देशांतील सरकारांचा पराभव घडवून आणणें हें कामगारांचे पहिले कर्तव्य होय असें लेनिन म्हणत असे. कामगार मातृभूमि जाणीत नाहीत, असें मार्क्स म्हणाला होता. मार्क्सवादांतील अनेक भ्रम पुढे नाहीसे झाले तसाच हा भ्रमहि नष्ट होऊन आज रशिया व चीन हे दोन्ही देश कट्टर राष्ट्रवादी झाले