पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पहिले : ९

सामर्थ्याची वाढ, संहारशक्तीचें वर्धन हेंच उद्दिष्ट डोळयांपुढे ठेवून सोव्हिएट रशियाने शिक्षणाची योजना आखली आहे. 'सायन्स अँड टेक्नॉलजी इन् मॉडर्न वॉरफेअर' या आपल्या ग्रंथांत पोक्राव्हस्की याने म्हटलें आहे की, 'अर्वाचीन युद्धशास्त्राचा विज्ञान हा पाया आहे. निसर्गशास्त्रे व समाजशास्त्र यांच्या ज्ञानानेच भावी युद्धाची तरतूद करतां येईल.' आणि या दृष्टीनेच रशियांतील तरुणांना शिक्षण दिलें जातें. तेथे शाळा-कॉलेजांतून जास्त भर शास्त्रीय विषयांवर व तंत्रविद्येवर असतो. शे. ६५ टक्के विद्यार्थी शास्त्र- शाखेकडे जातात. शालेय अभ्यासक्रमांत १० वर्ष गणित, ४ वर्षे रसायन, ५ वर्षे पदार्थविज्ञान व ६ वर्षे जीवनशास्त्र यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागतो. शाळा २१३ दिवस भरतात. आठवड्यांतून ६ दिवस रोज सहा तास शाळा असते. शेवटचीं चार वर्षे शाळेशिवाय घरी रोज ४ तास अभ्यास करावा लागतो. १९५८ सालच्या हिशेबाप्रमाणे रशियांत ७६७ उच्च शिक्षणसंस्था आहेत व त्यांत वीस लक्ष विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यांतील १९३ संस्था इंजिनिअर तयार करतात. तेथे या विषयाच्या भिन्न भिन्न २०० शाखांचें अध्यापन केलें जातें. १९५० सालापर्यंत दरसाल ३६००० इंजिनिअर तयार होत. १९५७ सालीं ७७००० इंजिनियर तयार झाले. यांशिवाय लष्करी विद्यालयांतून तयार झालेले इंजिनियर ते निराळेच. एका मास्को विद्यापीठाच्या वर्णनावरून तेथील शिक्षणाविषयी आपल्याला कल्पना येऊ शकेल. ३६० कोटी रुपये खर्च करून हें विद्यापीठ १९५३ साली बांधण्यांत आलें. त्यांत १६००० विद्यार्थी आहेत. त्यांपैकी निम्म्या विद्यार्थिनी आहेत. विद्यापीठांत १७०० प्रयोगशाळा आहेत. १५००० वर्ग आहेत. २४०० प्राध्यापक आहेत. अभ्यासक्रम पांच वर्षांचा असून सायन्स विभागाकडे शे. ६५ विद्यार्थी असतात. पण त्यांनाहि अर्थशास्त्र व तत्त्वज्ञान हे विषय घ्यावे लागतात.
 रशियांत सर्व शिक्षण मोफत आहे. शिवाय कॉलेजमधील विद्यार्थ्यांना दरमहा ३६० ते ६०० रु. पर्यंत शिष्यवृत्ति मिळते. आता प्रत्येक विद्यार्थ्याने दोन वर्षे कारखान्यांत काम केल्यावांचून त्याला पदवी मिळावयाची नाही असा नवा नियम झाला आहे. विद्यार्थी पोषाखी होत आहेत, शरीरश्रमाचा कंटाळा करीत आहेत अशी शंका आल्यामुळे अधिकान्यांनी हा नियम केला