पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९० : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

धर्मक्रान्ति केली ती हीच होय, आणि अशा रीतीने जास्तीत जास्त विज्ञानपूत करून घेतलेली श्रद्धा ही मानवाला केवढी ध्येयशक्ति प्राप्त करून देते तें आपण वर पाहिलेच आहे. परमेश्वर आहे की नाही हा प्रश्न येथे सर्वस्वी अप्रस्तुत आहे. ग्रीक इतिहासाचें विवेचन करतांना फिशर या पण्डिताने म्हटले आहे की, मानवाला प्रेरणा मिळते ती मूळ वास्तवापासून किंवा सत्यापासून मिळत नसते, तर त्या वास्तवाविषयी त्याची जी कल्पना असते तिच्यापासून मिळते. भोवतालच्या इतर रानटी जमातींहून आपण वंशतः श्रेष्ठ आहों अशी ग्रीकांची श्रद्धा होती. वास्तविक हें सत्य नव्हते, पण त्यांची तशी श्रद्धा इतकी जबरदस्त होती की, तीच त्यांच्या उत्कर्षाला, अलौकिक वैभवाला कारणीभूत झाली. धर्मश्रद्धेचें असेंच आहे. ती श्रद्धाच मानवाच्या उत्कर्षाला, वैभवाला आजपर्यंत कारणीभूत झालेली आहे. मात्र समाजधारणेसाठी अवश्य असलेल्या या महाशक्तीचा विनियोग समाजधुरीण कसा करतात यावर सर्व अवलंबून आहे.
 वर सांगितलेच आहे की, भारताची लोकसत्ता यशस्वी व्हावयाची असेल तर अशा तऱ्हेची धर्मक्रान्ति येथे होणें अवश्य आहे. गेलीं हजार दीड हजार वर्षे तरी आपला धर्म वैयक्तिक व मोक्षवादी असल्यामुळे आपल्या समाजाचा अध:पात झाला आहे. पाश्चात्त्य देशांतील धर्माचें जें नवें स्वरूप आहे त्यांत संघटना आहे, बुद्धिवाद आहे, ज्ञाननिष्ठा आहे आणि प्रयत्नवाद आहे. समाजधारणेला अत्यंत अवश्य असलेल्या या गुणांचा आपल्या समाजांतून मधल्या काळांत अगदी लोप झाला होता. मोक्ष, परलोक हेंच साध्य असल्यामुळे संघटित जीवनाची लोकांना आवश्यकता कधी भासलीच नाही. कारण हजार पांचशे लोक एकत्र येऊन संघटित बल निर्माण करून मोक्ष मिळवावयाचा नसतो. त्यासाठी अवश्य तें धर्माचरण एकट्यानेच करावयाचें असतें, आणि भजन, कीर्तन, मनन-चिंतन हेंच प्रामुख्याने त्या धर्माचरणाचें स्वरूप असल्यामुळे ऐहिक जीवनाला अवश्य तो प्रयत्नवाद त्यांतून जोपासला जात नाही. आपला शेतकरी, कारागीर आणि वारकरी हा आज शेकडो वर्षे दैववादी झाला आहे. त्यामुळे नवें संशोधन करावें, निसर्गावर मात करावी, शेतीच्या, विणकामाच्या, सुतारकामाच्या, लोहारकामाच्या नव्या पद्धति शोधून काढाव्या ही ईर्षाच त्याच्या ठायीं कधी निर्माण झाली नाही,