पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सहावें : १८९

मनुष्याची तीव्र, अतिउत्कट इच्छा असते, आणि परमेश्वर अशी शक्ति आहे असें जगांतले सर्वश्रेष्ठ तत्ववेत्ते व धर्मवेत्ते सांगत असल्यामुळे त्याच्यावर मनुष्य साहजिकच श्रद्धा ठेवतो. दुसरेंहि एक कारण आहे. जगांतील दुःखांतून मुक्तता ही जशी मानवाची आर्ती आहे त्याचप्रमाणे मृत्यूनंतरच्या जीवनाची, अमरतेचीहि मानवाला आस आहे. भौतिक देह हा नाशवंत आहे, तो अमर होऊं शकत नाही हें तो जाणतो, पण याच देहांतील आत्मा अमर आहे ही कल्पना, ही श्रद्धा त्याला फार मोठें समाधान प्राप्त करून देते. देहनाश म्हणजे सर्वनाश, मरण म्हणजे पूर्णं विलय, अगदी शून्याकार असें जर मनुष्याला वाटलें तर त्याचें जीवित वैराण होईल, त्याचें वाळवंट होईल. हें जीवित अर्पून, प्राणहि टाकून कांही मिळवावें असें त्याला कधीहि वाटणार नाही. कारण प्राण टाकल्यावर मिळवावयाचें कोणी आणि कोणासाठी ? पुढच्या जन्मीं मींच मिळवावयाचें आणि तें माझ्या आत्म्यासाठी मिळवावयाचें ही श्रद्धा मानवाला ध्येयवादी बनविते. वाटेल त्या त्यागाला, तपश्चर्येला त्याला उद्युक्त करते. ती मानवी जीवनांतून लुप्त झाली तर मानव तपहीन, ध्येयहीन होईल आणि त्यामुळेच तो दुबळा होईल. तेव्हा परमेश्वर माता आहे, संकटहर्ता आहे ही श्रद्धा जशी मानवाच्या मनःस्वास्थ्यासाठी अवश्य आहे तशीच अमरतेची, अनंतत्वाची त्याची आकांक्षा तृप्त करण्यासाठीहि ती अवश्य आहे. ही श्रद्धा हीच धर्मबुद्धि होय.
 पण ही श्रद्धा मूळच्या अंधस्थितीत राहू दिली तर, मानवाच्या इतर अनेक सहजप्रवृत्ति मूळच्या असंस्कृत अवस्थेत राहू दिल्या तर जशा अनर्थास कारण होतात, तशीच हीहि होते. अंधश्रद्धेमुळे आतापर्यंत किती व कसे अनर्थ उद्भवले हें स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही, ते सर्व विश्रुत आहेत. म्हणून ही श्रद्धा शक्य तितकी विज्ञानपूत करून घेणें अवश्य असतें. परमेश्वर किंवा सृष्टीचें मूळ कारण हें सर्वस्वी बुद्धीच्या किंवा विज्ञानाच्या कक्षेत येणें कधीहि शक्य नाही. आज कोणाच्या स्वप्नांतहि ही आशा नाही; पण विवेकाच्या, विज्ञानाच्या अग्नींत घालून ती शक्ति जास्तीत जास्त शुद्ध करून घेणें, तिला अत्यंत उदात्त रूप देणें हें मात्र शक्य व अत्यंत अवश्य आहे. पाश्चात्य राष्ट्रांनी गेल्या तीन चारशे वर्षांत हें केलें आहे. त्यांनी