पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

मागल्या काळांतच वरिष्ठ वर्णीयांनी केलेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्यास, शांततेने प्रतिकार करण्यास क्वेकर पंथाप्रमाणे हिंदुधर्मधुरीणांनी त्यांना शिकविलें असतें, तर आज या जमाती समाजाला आधारभूत झाल्या असत्या आणि हिंदु समाज कर्तृत्वसंपन्न झाला असता; पण ही दृष्टिच येथे नव्हती. असली धर्मक्रान्ति येथे कधी झालीच नाही, आणि दुर्देव असें की आज ही दृष्टि प्राप्त झाली असूनहि तसली धर्मक्रान्ति येथे घडून येत नाही. हें कार्य झेपण्याइतकी धर्मनिष्ठा भारतीयांत नाही असा याचा स्पष्ट अर्थ आहे.
 भारतीय जनतेंत धर्मश्रद्धाच नाही, ती लुप्त झाली आहे असा मात्र याचा अर्थ नाही. धर्मश्रद्धा ही कोणत्याहि समाजांतून कधीहि लुप्त होणें शक्य नाही असें माझें निश्चित मत आहे. हिंदु समाज त्याला अपवाद नाही. काशी, रामेश्वर, अयोध्या, द्वारका, पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या पाहिली, कुंभमेळ्यासारख्या पर्वणीला सहज तीस-चाळीस लाख यात्रा जमते हें लक्षांत घेतलें, साईमहाराज, नारायणमहाराज, उपासनी, मेहेरबाबा यांचे भक्त कोणत्या वर्गातून येतात हें ध्यानीं घेतलें म्हणजे विसाव्या शतका- विषयीच्या, बुद्धिवादी युगाविषयीच्या, भौतिकवादाच्या प्राबल्याविषयीच्या आपल्या भ्रांतिष्ट कल्पना तत्काळ नष्ट होतील. आपण हें ध्यानांत घेतलें पाहिजे की, विज्ञानाची, मानवी सामर्थ्याची कितीहि प्रगति झाली तरी मानवाचें दुःख शतांशानेहि नष्ट करणें त्याला शक्य होणार नाही. परमेश्वराचें मूळ रूप कसे आहे, तो निर्गुण आहे कीं सगुण आहे, तो अवतार घेतो की नाही, बुद्धीला त्याचे आकलन होईल की नाही हें सांगणें फार कठीण आहे. तें कोडें मानवी बुद्धीला उलगडणार नाही असें तत्त्ववेत्तेच सांगतात. पण असे असले तरी परमेश्वर हा मानवाचा फार मोठा आधार आहे यांत मात्र शंका नाही. हें जग अत्यंत दुःखमय आहे. मनुष्यावर, त्याच्या आप्तजनांवर, त्याच्या संसारावर, पदोपदी अनंत आपत्ति येत असतात. संकटांनी तो अत्यंत जर्जर झालेला असतो. रोगराई, दारिद्र्य, अन्नान्नदशा व मृत्यु या दुःखांनी तो सतत गांजलेला असतो, आणि मानवी भौतिक उपायांनी या आपत्तींना तोंड देणें शक्य नाही हें प्रतिक्षणीं त्याला दिसत असतें. अशा वेळी कोणती तरी दैवी शक्ति- अत्यंत वत्सल, दयाळू, न्यायी व सर्वसमर्थं अशी शक्ति- आपल्याला आश्रय म्हणून असावी अशी