पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सहावें : १८७

मठस्थापना करून भोवतालच्या समाजांत हें कार्य करतात. पण अशा मठांची स्थापना या हिंदुत्ववादी संस्था भारतांतल्या जंगलां -पहाडांत तर राहोच, पण खेड्यांतहि करीत नाहीत. तें त्यांचे उद्दिष्टच नाही. काँग्रेस परधार्जिणी आहे एवढी टीका फक्त त्या करतात. मिशनऱ्यांपासून धोका कसा आहे तें समाजाला त्या सांगतात. पण हा रोग निवारण्याचा जो मूलगामी उपाय- म्हणजे मिशनऱ्यांचेच कार्य आपण करणें- त्याचा अवलंब मात्र त्या करीत नाहीत. कारण त्यांना म्युनिसिपालिटींत निवडून यांवयाचें आहे.
 अशी ही वर सांगितल्याप्रमाणे निराशाजनक स्थिति आहे. व्यक्तीचा उद्धार करणारी, तिच्या सुप्त गुणांचा विकास करण्याची संधि देणारी संस्था हे स्वरूप अजूनहि हिंदुधर्माला येत नाही. पूर्वी हा धर्म फक्त वैयक्तिक पुण्याची, मोक्षाची जोड करून देत असे. आता त्याच्या नांवाने स्थापन झालेल्या संस्था सत्ताप्राप्तीचें राजकारण खेळत आहेत. गेल्या हजार दीड हजार वर्षांचा हिंदुधर्माचा इतिहास पाहिला तरी मनावर निराशाच येते. पतित, दीन, बहिष्कृत, अनाथ यांना आश्रय द्यावा, त्यांना अन्यायाचा प्रतिकार करण्यास शिकवावें, संघटित करावें, त्यांच्या योगक्षेमाची चिंता वाहावी आणि अशा रीतीने या थोर धर्माचा पाया भक्कम करावा असें येथील धर्मधुरीणांचें धोरण कधीच नव्हतें. त्यांना दूर लोटणें, त्यांचा वाराहि न लागू देणें, त्यांची सावलीहि न घेणें, त्यांचा शब्दहि कानीं न पडूं देणें यांतच धर्माचरण आहे असें त्यांना वाटत असे. ज्ञानेश्वरादि संतांनी हें धोरण बदलण्याचे प्रयत्न केले. परमार्थात त्यांना कांही यशहि आले. सामाजिक व्यवहारांत त्याचा थोडा परिणामहि झाला. पण त्यांच्या वचनांचा जो भरीव सामाजिक अर्थ तो कोणींहि जाणला नाही. मग पाश्चात्त्य मेथॉडिस्ट, क्वेकर इत्यादि पंथीयांप्रमाणे तो प्रत्यक्ष आचरणांत आणणे दूरच राहिलें. त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या काळी आपल्या समाजांतील शूद्र, अस्पृश्य, भिल्ल, कोळी, कातकरी इत्यादि जमातींची जी स्थिति होती तिच्यांत पुढल्या सहाशे वर्षांत कसलाच फरक पडला नाही. या समाजांतून वर सांगितल्या प्रकारचे कर्तृत्वशाली पुरुष किती निर्माण झाले याचा हिशेब घ्यावा म्हणजे हिंदुधर्माने यांच्यासाठी काय केलें तें सहज कळून येईल. त्या