पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८६ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

महाराजांना किंवा त्यांच्या अनुयायांना स्पर्शहि झालेला नसतो. साईमहाराज गेल्यानंतर दहा वर्षेपर्यंत एका सामान्य चतुर गृहस्थाने त्यांचें दर्शन घडवितों असें सांगून हजारो सुशिक्षित अनुयायांना हातोहात फसविलें, त्यांच्याकडून अमाप पैसा उकळला, ही वार्ता नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. हे श्रम व हा पैसा जे का रंजले गांजले त्यांच्यासाठी संस्था उभारण्यांत खर्ची पडला असता तर! पण धर्म हें सामाजिक पुण्य आहे ही दृष्टिच आपल्याला नाही. आपली सर्व धडपड वैयक्तिक पुण्यासाठी आहे.
 यानंतर आजच्या हिंदुत्ववादी संस्थांचा विचार हिंदुमहासभा, जनसंघ, वर्णाश्रमस्वराज्य संघ, अशा अनेक संस्था हिंदुधर्म रक्षणाचे ब्रीद मिरवीत आहेत. पण त्या सर्व आज सत्तास्पर्धेच्या राजकारणात उतरल्या आहेत. नगरपालिका, लोकल बोर्डे, विधानसभा या ठिकाणच्या निवडणुका लढविणें यावरच आज या संस्थांची शक्ति खर्च होत आहे. पाश्चात्य मिशनऱ्यांची पाताळयंत्री कारस्थानें या संस्थांनी ओळखली आहेत. त्यावर टीका करून त्यांच्या धर्मप्रसाराला बंदी घालावी अशा मागण्याहि विधानसभेत हे लोक करतात. पण पाश्चात्त्य मिशनरी आज तीनशे वर्षे दीन, बहिष्कृत, असहाय, अनाथ यांच्या उद्धाराचें जें कार्य करीत आहेत तें आपण करावें, अशी वृत्ति या संस्थांची नाही. वास्तविक श्रेष्ठ अर्थाने हेंच खरें राजकारण आहे. कारण वर सांगितल्याप्रमाणे व्यक्तीची प्रतिष्ठा हाच खरा लोकशाहीचा म्हणजेच श्रेष्ठ राजकारणाचा पाया आहे. भारतामध्ये अस्पृश्य, आदिवासी, बहिष्कृत, पतित, दीन, दरिद्री यांचीच संख्या दहाबारा कोटींपर्यंत भरेल. या समाजांतून तत्त्ववेत्ते, इतिहासकार, मुत्सद्दी, राजकारणी, धर्मज्ञ, साहित्यिक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, संशोधक, शिक्षक, कलाकार, व्यापारी, कारखानदार असे कर्ते पुरुष निर्माण होतील तेव्हाच लोकशाहीची ही प्रचंड जबाबदारी पेलण्याचे सामर्थ्य भारतीय समाजाला प्राप्त होईल. पण या समाजांतील लोकांना जीवनांत प्रतिष्ठा लाभल्यावांचून त्यांच्यांतून असे पुरुष कधीच निर्माण होणार नाहीत. ती प्रतिष्ठा प्राप्त करून देणें हें धर्माचं कार्य आहे, आणि म्हणूनच हिंदुमहासभा, जनसंघ या संस्थांचें तें कार्य आहे. पाश्चात्त्य मिशनरी आफ्रिकेच्या, ब्राझीलच्या, मंगोलियाच्या जंगलांत जातात, हिमालयांत येतात, सातपुड्यांत फिरतात, आणि तेथे