पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सहावें : १८५.

आहे. पण आजच्या श्रीशंकराचार्यांनी पाश्चात्य धर्मसंस्थांप्रमाणे दीन- दलितांच्या उद्धराचें कार्य हातीं घेतलें आणि लोकांपुढे शब्द टाकला तर फादर अल्बिनो, टालव्हास यांच्या शतपटीने यांना कार्य करतां येईल आणि तसें झालें तरच भारतीय लोकसत्ताहि टिकूं शकेल. व्यक्तीची प्रतिष्ठा हा लोकशाहीचा पाया आहे. अस्पृश्य, आदिवासी, पतित, असहाय, अनाथ, यांच्या वस्तीत श्री संचार करू लागले आणि पीठाची सर्व पुण्याई खर्च करून त्यांनी समाजांतील श्रेष्ठींना आवाहन केलें तर ह्या सर्व जनांच्या जीविताला निश्चित प्रतिष्ठा प्राप्त होईल, पण पीठस्थ अधिकारी इकडे वळतील अशी मुळीच आशा नाही.
 वारकरी पंथ हा महाराष्ट्रांतला फार मोठा पंथ आहे. रंजले गांजले यांचा उद्धार करण्याची जबाबदारी त्याच्यावर फार मोठी आहे. प्रारंभी जीं संतवचनें दिली आहेत तीं सर्व या पंथांतल्या सर्वश्रेष्ठ पुरुषांचीच आहेत. पण त्या वचनांचा जो सामाजिक अर्थ आहे त्याची गंधवार्ताहि जुन्या आणि नव्या वारकऱ्यांना नाही. अस्पृश्योद्धार हे एकच कार्य वारकऱ्यांनी हातीं घेतलें असतें तर हजारो अस्पृश्य जें धर्मांतर करीत आहेत ते त्यांनी केलें नसतें. वारकरी बह्वंशीं खेड्यापाड्यांतच असतात, आणि खेड्यापाड्यांत अजूनहि अस्पृश्यतेचा फार मोठा जोर आहे. तिचे उच्चाटन झालें नाही तर राहिलेला अस्पृश्य समाजहि असाच धर्मांतर करील हें उघड दिसत आहे. पण वारकरी पंथाला, त्यांतील धुरीणांना याची चिंता नाही. मग आदिवासी, पतित, बेवारशी, अनाथ, वेश्या या वर्गांत शिरून त्यांच्यांत राहून, त्यांच्या सुखदुःखाशी समरस होऊन, त्यांच्या योगक्षेमाची चिंता वाहून त्यांना प्रतिष्ठित जीवनांत स्थिर करण्याच्या कार्याला वारकरी पंथाचे धुरीण वाहून घेतील ही आशा स्वप्नांतहि करतां येत नाही. इतर जुन्या धर्मसंस्थांची व पंथांची हीच कथा आहे, आणि तीच कथा गेल्या पांचपन्नास वर्षांत निर्माण झालेल्या महाराजांच्या संस्थांची आहे. त्या सत्यनारायण करतात, भंडारे करतात, त्यांचे दर्शनांचे कार्यक्रम होतात. पण समाजांतली भोळसट, बावळी, अंध धर्मश्रद्धा नष्ट करावी, धर्माला विज्ञानवादी, बुद्धिवादी बनवावें, आपली धर्मतत्त्वे कमाल मर्यादेपर्यंत विज्ञानपूत करून त्यांचा उपदेश करावा, प्रसार करावा असें धोरण त्यांनी मुळीच अवलंबिलेले नाही. या विचारांचा