पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८४ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

अशाच प्रमाणाचे आहेत असें वाटतें. लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याने फार मोठी मनःक्रांति घडवून आणली हें खरें आहे. धर्माचें पूर्वीचें निवृत्तिपर रूप आता जवळ जवळ नष्ट झाले आहे यांत शंका नाही; पण आज एकंदर भारतीय समाजांत धर्म ही समाजोन्नतीची, ऐहिक उत्कर्षाची प्रेरणा आहे असें दिसत नाही. पाश्चात्य देशांत चर्च हें बहुतेक सर्व खेड्यांत आणि शहरांत धर्मकार्याबरोबरच समाजकार्याचें केंद्र झालेले आहे. गांवांतील अनाथ, अपंग, दलित यांचें तें आश्रयस्थान होऊन बसलेलें आहे, आणि भोवतालच्या समाजांतील लोकांचा योगक्षेम वाहणारी संस्था असे रूप तिला देण्याचे फार जोराचे प्रयत्न तेथे चालू आहेत. भारतांतील धर्मवेत्त्यांनी, धर्माभिमान्यांनी आणि धर्मप्रवर्तकांनी आपल्या धर्मसंस्थांना हें रूप प्राप्त करून दिले तरच आपला धर्म समाजोद्धाराच्या दृष्टीने एक प्रभावी अशी शक्ति ठरेल.
 या दृष्टीने पाहतां आजची स्थिति फार निराशाजनक आहे. हिंदुधर्माचें मुख्य पीठ म्हणजे श्रीशंकराचार्यांचे. आपल्याकडे ख्रिस्ती धर्माच्या चर्चसारखी धर्म ही एक संघटित संस्था नाही. तरी पण मुख्य पीठाचा मान संकेताने तरी श्रीशंकराचार्यांना मिळतो. पण वरील पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने पाहिलें तर आजचे त्या पीठावरचे अधिकारी पुरुष शून्यवत् आहेत. धर्मक्रांति करावी, समाजांतील विषमता नष्ट करावी, दीनदलितांचा कैवार घेऊन उठावें, त्यासाठी संस्था स्थापन कराव्या हें धोरण पीठस्थ अधिकाऱ्यांचें केव्हाच नव्हतें आणि नाही. मागल्या काळांत विद्यारण्यस्वामींनी ऐहिकोन्मुख होऊन स्वराज्य, स्वातंत्र्य, साम्राज्य हे धर्माचेंच कार्य आहे अशी दृष्टि ठेवून प्रयत्नाला प्रारंभ करताच भारताच्या इतिहासालाच कलाटणी मिळाली हें सर्वश्रुत आहे. पण आज ही दृष्टि पीठाची नाही. पीठस्थ अधिकारी चातुर्मास्यामध्ये स्त्री-पुत्र-धन-दौलत हें सर्व क्षणभंगुर आहे हेंच तत्त्वज्ञान सांगत असतात. मात्र गेलीं तीस चाळीस वर्षे या क्षणभंगुर धनदौलतीसाठी पीठस्थ शंकराचार्यांचे प्रीव्ही कौन्सिलपर्यंत व सुप्रीम कोर्टापर्यंत दावे चाललेले आहेतच. पीठाच्या योगक्षेमासाठी धनदौलतीची फार आवश्यकता आहे एवढे त्यांना मान्य झालेलें दिसतें. तशीच आवश्यकता दीनदलितांच्या योगक्षेमासाठी आहे हें त्यांना पटलें तर धर्मक्रांति फार दूर नाही. आज नव्या युगांत समाजांत पीठाबद्दल जुन्या काळाप्रमाणे आदर नाही हें खरें