पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सहावें : १८३

आणि कार्यक्षम ठेवला. दुर्दैवाने भारतांत धर्माला असें सामाजिक रूप देणारा महात्मा जन्माला आलाच नाही. त्यामुळे मोक्षसाधन हेंच धर्माचें प्रधान रूप होऊन बसले. ऐहिक व्यवहारांत धर्म राहिला तो म्हणजे केवळ कर्मकांड! स्नानसंध्या, सोवळेओवळें, भक्ष्याभक्ष्य, उपासतापास, वाऱ्या, तीर्थयात्रा, टिळेमाळा यालाच लोक त्या काळांत धर्म मानीत असत. हा अत्यंत हीन व अमंगल धर्म होय. संतांनी याची परोपरीने निर्भर्त्सना केली आहे. पण समाज त्या कर्मकांडाला आणि त्याच्याच अनुषंगाने जातिभेद, अस्पृश्यता, यांना आणि शब्दप्रामाण्याला व दैववादाला चिकटून राहिला.
 युरोपांत धर्मपंथ स्थापन झाले त्याचप्रमाणे कोपर्निकस, केप्लर, गॅलिलिओ, डाल्टन, न्यूटन, रॉजर बेकन, फ्रॅन्सिस बेकन हे विज्ञानवेत्तेहि निर्माण झाले; आणि धर्मातील शब्दप्रामाण्य, अंधश्रद्धा, दैववाद, विषमता यांशी त्यांनी प्राणपणाने संग्राम केला. त्यामुळे धर्मांतील हीं जळमटें नष्ट होऊन तो शुद्ध झाला, विज्ञानपूत झाला, त्याला सामाजिक रूप आलें. एक सामाजिक शक्ति अशी प्रतिष्ठा त्याला प्राप्त झाली. भारतांत ब्रिटिश येण्यापूर्वी हिंदुधर्माला हें स्वरूप प्राप्त झालें नाही.
 पाश्चात्त्यविद्येच्या प्रसारानंतर येथे धर्माच्या पुनरुज्जीवनाला व धर्मक्रांतीला खरा प्रारंभ झाला, आणि हिंदुधर्माला इहलोकनिष्ठ व सामाजिक रूप प्राप्त होऊं लागलें. या दृष्टीने ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज आणि विशेषतः आर्यसमाज यांचे कार्य फार मोठें आहे. आर्यसमाजाने अस्पृश्य, दलित यांना वेदमंत्रांचा अधिकार देऊन अवश्य ती सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि याच्याच जोडीला शिक्षणाच्या प्रसाराची मोहीम हाती घेतली. आज सर्व हिंदुस्थानांत आर्यसमाजाची अनेक महाविद्यालये आणि अनेक शाळा आहेत. औद्योगिक व तांत्रिक शिक्षणाच्याहि अनेक संस्था समाजाने स्थापन केल्या आहेत. एकंदर पाहतां धर्माच्या पुनरुज्जीवनाच्या क्षेत्रांत वर सांगितलेले युरोपीय धर्मपंथांचें जें धोरण आहे तशाच प्रकाचें धोरण आर्यसमाजाचें आहे आणि त्यामुळे पंजाबमध्ये त्याच्या उद्योगाला स्पृहणीय असें यशहि प्राप्त झालें आहे. स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने स्थापन झालेली रामकृष्णमठ ही संस्थाहि अशाच प्रकारचें धर्मकार्य करीत आहे, पण भारताचा एकंदर व्याप पाहिला तर हे सर्व प्रयत्न 'दर्यामें खसखस'