पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८२ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

नाही; उलट इहलोकींचें वैभव, येथली समृद्धि, संपन्नता, अर्थकामांची प्राप्ति हे धर्माचे एक प्राप्तव्यच आहे अशी प्राचीन भारतीय ऋषींप्रमाणेच युरोपातल्या धर्मज्ञांचीहि धारणा आहे; आणि त्यामुळेच आज युरोप, अमेरिकेत धर्मनिष्ठा पूर्ण जागृत झाली असून समाजाला कर्तृत्वाची, या विज्ञान-युगांतहि, प्रेरणा देण्यास ती समर्थ झाली आहे.
 या स्वरूपाची धर्मक्रांति भारतांत झाली, धर्म ही आपल्या समाजांत एक जिवंत शक्ति झाली तरच भारताच्या उन्नतीला अवश्य तें कर्तृत्व येथे निर्माण होईल. भारतांत वेदकालांत व पुढे महाभारतकालांत आणि इसवीसनाच्या पहिल्या पाचसहा शतकांत धर्म असाच इहलोकनिष्ठ व प्रवृत्तिपर होता. शंकराचार्यांच्या काळापासून हे सर्व पालटलें असें वाटतें. मोक्ष व संसार, परलोक आणि ऐहिक वैभव यांची फारकत झाली आणि सर्व लोक संन्यासी झाले नाहीत तरी संसाराविषयी, स्त्रीपुत्रांविषयी, ऐहिक वैभवा-विषयी त्यांच्या मनांत उदासीनता, तुच्छता आणि घृणाहि निर्माण होऊन समाजाच्या पराक्रमाचा कणाच मोडून पडला. पुढे संतांच्या कालांतहि समाजाच्या या मनःप्रवृत्तींत फरक पडला नाही. भारतांतल्या सर्व प्रांतांतील संतांनी स्त्रीपुत्र, धनदौलत, राज्यसाम्राज्य यांची कमालीची निंदा केली आहे. त्यामुळे संसारांत राहूनच भक्तियोग साधावा, असा जरी त्यांनी उपदेश केला असला तरी हा संसार अत्यंत तुच्छ आहे, पापमय आहे, त्यांत रमणे कमीपणाचें आहे ही भावना आपल्या समाजांत कायमच राहिली, नव्हे, आणखी दृढमूल झाली. यामुळे धर्म हें केवळ एक मोक्षसाधन झालें. वैयक्तिक पुण्य असें त्याला रूप आलें. सामाजिक संघटनेची, समाजोद्धाराची एक महाशक्ति, एक प्रबल प्रेरणा असें रूप हिंदुधर्माला ब्रिटिश येथे येईपर्यंत आलेच नाही. दलितांच्या योगक्षेमाची चिंता वाहणे, अनाथ, अपंग, उपेक्षित, असहाय यांच्यासाठी संस्था स्थापून त्यांच्या जीविताची प्रतिष्ठा वाढविणें, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करणें हें धर्माचें कार्य आहे असें युरोपातल्या प्रमाणे येथे, समर्थ रामदासस्वामी हा एक अपवाद सोडला तर, कोणाला वाटलेच नाही. अन्यायाचा प्रतिकार हे समाजाच्या जिवंतपणाचें पहिले लक्षण होय. युरोपातल्या क्वेकर मेथॉडिस्ट, साल्व्हेशन आर्मी या पंथांनी दलितांना या प्रतिकाराला सिद्ध करून तेथला धर्म जिवंत