पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सहावें : १८१

त्यासाठी समाजांतील कर्त्या पुरुषांनी आपण होऊन पुढाकार घेऊन शेकडो संस्था स्थापून, समाजबल संघटित करून समाजसेवेचे व्रत घेणाऱ्या स्त्री- पुरुषांच्या सेनाच उभारल्या पाहिजेत. दण्डसत्तांकित देशांत अशा सेना असतातच; पण त्या सरकारच्या सक्तीने, दण्डभयाने काम करीत असतात. मुळीच कामें न करण्यापेक्षा ही गोष्ट शतपटीने चांगली आहे; पण ज्यांना लोकशाही साध्य करावयाची आहे त्यांना मानवी कर्तृत्वाला प्रेरणा देणाऱ्या अन्य शक्तींचा, निष्ठांचा आश्रय केला पाहिजे. राष्ट्रनिष्ठा व धर्मनिष्ठा या त्या शक्ति होत. पाश्चात्त्य राष्ट्र आज जगत आहेत, आपला उत्कर्ष साधीत आहेत, सामर्थ्यसंपन्न होत आहेत तीं या निष्ठांची आराधना करून होत आहेत हे दाखविण्यासाठी विषयाचा एवढा प्रपंच येथवर केला.
 वरील विवेचनावरून हें ध्यानांत येईल की, पाश्चात्त्यांनी गेल्या तीनशे वर्षात आपल्या धर्माचे स्वरूप आमुलाग्र पालटून टाकलें आहे. आपापल्या समाजांत त्यांनी फार मोठें धर्मपरिवर्तन घडवून आणले आहे. पूर्वी धर्म हा व्यक्तिनिष्ठ शब्दप्रामाण्यवादी, विज्ञानविरोधी व बह्वंशीं परलोकनिष्ठ असा होता. अशा धर्माने इहलोक तर नाहीच पण परलोकहि साधणार नाही हे तेथील समाजनेत्यांच्या तत्त्ववेत्यांच्या ध्यानी आले आणि त्यांनी धर्मसुधारणेसाठीच धर्मसंग्राम सुरू केला. दीर्घकालच्या या संग्रामामुळे तेथील धर्मपीठांतहि हळूहळू परिवर्तन होऊ लागले आणि आज समाजाच्या उन्नतीला अवश्य असलेल्या धर्माचें प्रवर्तन स्वतः हीं धर्मपीठेच करीत आहेत असे दृश्य आपल्याला दिसूं लागलें आहे. मध्यंतरी एक काळ असा होता की, विज्ञानाच्या आश्चर्यकारक प्रगतीमुळे ईश्वरनिष्ठेची, श्रद्धेची, भक्तिभावनेची समाजाच्या प्रगतीला मुळीच गरज नाही असा एक समज सुशिक्षितांमध्ये रूढ झाला होता. पण आता आइनस्टाईन, ऑलिव्हर लॉज, सर जेम्स जीन यांसारखे मोठमोठे विज्ञानवेत्तेच ईश्वरश्रद्धा ही मानवाच्या प्रगतीला आवश्यक आहे, मानवी जीवनाचें कोडे केवळ बुद्धीने उलगडणें अशक्य आहे, भक्तीशिवाय तरणोपाय नाही असें सांगत आहेत. त्यामुळे धर्माला युरोपांत श्रेष्ठ प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. मात्र आता नवीन उदयाला आलेला धर्म, श्रद्धा, भक्ति यांचा उपदेश करीत असला तरी इहलोकाची उपेक्षा करावी, विज्ञानाला विरोध करावा हे त्याच्या स्वप्नांतहि