पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८० : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

तिचें लग्न करून देण्याचीहि खटपट होते. गेल्या दहाबारा वर्षांत अनेक स्त्रिया या रीतीने प्रतिष्ठित जीवनांत स्थिर झाल्या आहेत.
 'टॉक् एच्' या संस्थेचे संस्थापक फादर क्लेटन यांनी तर 'प्रवचनें न करतां धर्मप्रसार करावा' असा आपल्या पंथीयांना आदेश दिलेला आहे. जीजसचा धर्म प्रसृत केला पाहिजे हें त्यांना मान्य आहे. त्यासाठीच त्यांचा सर्व उद्योग आहे. पण 'मानवसेवा' हाच धर्मप्रसाराचा खरा मार्ग होय असें त्यांचे मत आहे. "मेळवूनि षोडशोपचार, प्रतिमा पूजितां साचार, स्वयें सुखावेना शंकर, जेवि चराचर पूजिलिया ॥ मुख्य पूजेचें आयतन, प्राणिमात्रा सुखदान ॥" हा श्रीएकनाथांचा उपदेश त्यांची संस्था तंतोतंत पाळीत आहे लंडनच्या 'ऑल हॉलोज चर्च' या मंदिराचे फादर क्लेटन हे उपाध्याय आहेत, पण त्यांनी स्थापिलेल्या 'टॉक् एच्' या संस्थेच्या शाखा आज वीस देशांत पसरल्या आहेत. नायगेरियामध्ये त्यांनी तेरा लाख रु. खर्च करून महारोग्यांसाठी रुग्णालय काढले आहे. दरबान येथे शंभर खाटा असलेले क्षयरोग्यांचे रुग्णालय स्थापिलें आहे. अनेक ठिकाणी त्यांनी क्रीडांगणें बांधली आहेत. उद्योगशाळा काढल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक संस्थेत अनेक स्वयसेवक असे असतात की, ते गावांतल्या अनाथ, असहाय, दलित अशा लोकांना कोणतेंहि साह्य करण्यास सारखे सिद्ध असतात. अपंगांना औषध आणून देणें, खुर्चीवरून हिंडविणें, लाकडे फोडून देणें, अंधांना वाचावयास शिकविणे इत्यादि सर्व प्रकारचीं कामें ते करतात. आपल्याला परमेश्वराने या पृथ्वीवर राहावयास जागा दिली आहे, तिचे भाडें आपण भरलें पाहिजे. 'प्राणिमात्रां सुखदान' या रूपाने तें भाडे द्यावे, असा फादर क्लेटन यांचा धर्मसंदेश आहे, आणि त्यांचे हजारो अनुयायी त्या संदेशाचें मनोभावें आचरण करून समाजोद्धार करीत आहेत.
 युरोप-अमेरिकेत आज शेकडो संस्था अशा तऱ्हेचे कार्य करीत आहेत आणि म्हणूनच तेथे लोकशाही काही प्रमाणांत तरी यशस्वी होत आहे. समाजांतल्या प्रत्येक व्यक्तीच्या अन्न-वस्त्र-घर-शिक्षण या प्राथमिक गरजा पुरविल्याच पाहिजेत, प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधि दिलीच पाहिजे हें नव्या लोकशाहीचें ब्रीद आहे. हें कार्य एवढे प्रचंड आहे की, सरकार कितीहि समर्थ व संपन्न झाले तरी त्याच्याकडून तें कधीहि होणें शक्य नाही.