पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सहावे : १७९

आणि त्यांच्या हातून निसटू पाहणाऱ्या स्त्रियांचीहि ते अशीच वासलात लावतात; म्हणून या क्षेत्रांत समाजसेवकांना तळहातावर शिर घेऊन प्रवेश करावा लागतो. राष्ट्रनिष्ठेप्रमाणेच धर्मनिष्ठाहि माणसाला ही शक्ति देते. असली कार्ये हा एक प्रकारचा धर्मसंग्रामच आहे. किंबहुना आज कोणतीहि समाजसेवा हा धर्मसंग्राम आहे. दारू, अफू इत्यादि मादक पदार्थ, तरुण मुलांची मनें भ्रष्ट करून टाकणारी हॉरर कॉमिक्ससारखी मासिकें, तरुण मुलींना पळवून त्यांना विकण्याचा व्यापार, या धंद्यांत लोकांनी कोटी- कोटींनी भांडवल गुंतविलेलें असतें, आणि युरोपांत तर आंतरराष्ट्रीय संघटना उभारलेल्या असतात. असल्या भस्मासुरी शक्तीला आव्हान द्यावयाचें म्हणजे एका महाधर्मसंग्रामालाच सिद्ध व्हावयाचें हें सहज कळण्याजोगे आहे, आणि त्यांच्याच तोडीच्या संघटना उभारल्या तरच या संग्रामांत विजय मिळणे शक्य आहे हेंहि ध्यानांत येणें अवघड नाही.
 फादर टालव्हास यांनी, या दृष्टीने पाहतां, कौतुकास्पद यश मिळविलें आहे. १९३७ साली पॅरामी या गांवीं ते व्हिकार (धर्मगुरु) होते. एक दिवस मरणोन्मुख झालेल्या एका स्त्रीला शेवटचा धर्मबोध करण्यासाठी त्यांना बोलावण्यांत आलें. ती स्त्री एक वेश्या होती. तिने आपली सर्व कहाणी टालव्हास यांना सांगितली तेव्हा त्यांचे हृदय पिळवटून निघालें आणि या अभागी स्त्रियांच्या उद्धारासाठी सर्वस्व अर्पण करण्याचे त्यांनी ठरविलें. आज 'ला निड' ही त्यांची संस्था हेंच कार्य करीत आहे. तें इतकें यशस्वी होत आहे की, जगांतल्या सर्व देशांतून त्याचा अभ्यास करण्यासाठी लोक येत आहेत. वेश्याव्यवसायांतून सोडवून आणलेल्या किवा तेथून आपण होऊन आलेल्या स्त्रियांची तेथे राहण्याची सोय करण्यांत येते. तेथे डॉक्टर आहेत, परिचारिका आहेत, शिक्षक आहेत, मानसशास्त्रज्ञ आहेत आणि या अभागी स्त्रियांच्या सेवेलाच वाहून घेणाऱ्या अनेक तरुण स्त्रिया आहेत. विशेष म्हणजे हे सर्व लोक स्वयंसेवक आहेत. फादर टालव्हास यांच्या प्रेरणेने ते ही धर्मसेवा करीत आहेत. तेथे आलेल्या स्त्रीला प्रथम रोगमुक्त होण्यासाठी उपचार केले जातात. तिची प्रकृति सुधारल्यावर तिला कांही पोटाचा उद्योग शिकविला जातो. मग पांच सहा महिने तिची एखाद्या संभावित कुटुंबांत राहण्याची सोय केली जाते आणि त्यानंतर