पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७८ : लोकसत्तला दण्डसत्तेचे आव्हान

असें सर्व पालकांनी त्याला सांगितलें. बटरवर्थ यांनी प्रथम सहा मुलें जमविलीं, थोड्याच दिवसांत सहाची आठ झाली आणि आता सहा हजार मुलें त्या क्लबलँडचे सभासद आहेत.
 पण बटरवर्थ यांनी केवळ धर्मोपदेश केला असता, केवळ भजन, नामसंकीर्तन केलें असतें तर हीं मुलें तेथे आली नसती. बटरवर्थ यांनी तेथे पिंगपाँग, बिलियर्ड इत्यादि खेळ सुरू केले, नाट्यसंस्था स्थापिली आणि चित्रकलेचा वर्ग सुरू केला. थोडी प्रगति होतांच ते लंडनमधील विख्यात शिल्पकार सर एडवर्ड मॉफी यांच्याकडे गेले व अशा वस्तीत एक भव्य चर्च बांधावयाचें आहे आणि तें तुम्हीं बांधून दिले पाहिजे असे त्यांनी त्यांना सांगितलें. सर एडवर्ड यांनी तें एकदम मान्य केलें. 'मी असें चर्च बांधीन की, अगदी इरसाल मवाली आला तरी त्याचें मस्तक तेथे नमलेच पाहिजे' असे ते म्हणाले आणि आपली प्रतिज्ञा त्यांनी पुरी केली. आज त्या वस्तीत 'रस्त्यावर' मुलें नाहीत. मग तीं कोठे आहेत ? त्यांनी स्वतःचें पार्लमेण्ट स्थापन केले आहे आणि क्रीडामंत्री, आरोग्यमंत्री, कलामंत्री अशा जागा निर्माण करून त्या सर्व वस्तीचें जीवनच त्यांनी आपल्या वर्चस्वाखाली आणले आहे. त्यांची क्रीडामंदिरें आहेत, रंगमंदिरें आहेत, दवाखाने आहेत, कारखाने आहेत. या क्लबलँडच्या सभासदांतून आज शेकडो व्यापारी, डॉक्टर, इंजिनियर निर्माण झाले आहेत, लंडनची रंगभूमि गाजविणारे नट व रॉयल ॲकॅडमीत स्थान मिळविणारे चित्रकार उदयास आले आहेत. ज्या रस्त्यावरच्या मुलांतून बह्वंशीं गुंड-मवाली निर्माण व्हावयाचे त्यांतूनच हे सुप्रतिष्ठित नागरिक निर्माण होऊन ब्रिटनचें जीवन समृद्ध करीत आहेत.
 फादर आंद्रे टालव्हास यांनी पॅरिसमधील वेश्यांच्या उद्धारासाठी चालविलेले कार्य पाहिले म्हणजे युरोपांतील धर्मनिष्ठा किती प्रकारांनी समाजसेवा करीत आहे याची सम्यक् कल्पना येईल. वाममार्गाला गेलेल्या या अभागी तरुण स्त्रियांची मुक्तता करण्याचा प्रयत्न करतांना प्रत्येक क्षणीं मृत्यूला तोंड देतच पुढे जावें लागतें, असा सर्व देशांतल्या समाजसेवकांचा अनुभव आहे. कारण या क्षेत्रांत काम करणारे दलाल केवळ सैतान असतात. त्यांच्या धंद्याच्या आड येणाराचा ते हातोहात निकाल लावतात