पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सहावें : १७७

सुतारकामाचा कारखाना असे अनेक व्यवसाय सुरू करून प्रथम दलितांना सुस्थिति प्राप्त करून दिली आणि हें करता करतांच धर्माचा, जीजसचा संदेशहि दिला. या पद्धतीने धर्मोपदेश केला म्हणूनच तो त्यांच्या चित्तांत दृढमूल झाला. भगवान् वेदव्यास यांनी धर्माची महती सांगतांना हेच धोरण ठेवले आहे. धर्माचे आचरण कां करावें ? तर त्यापासून अर्थ व काम हे प्राप्त होतात म्हणून, असें ते सांगतात. फादर अल्बिनो यांनी हे धर्म रहस्य जाणलें होतें. म्हणून धर्म या महाशक्तीचा त्यांना समाजोद्धारासाठी उपयोग करता आला. त्यांनी जें कार्य केलें त्याला डॉक्टर, वकील, इंजिनियर या मध्यमवर्गीयांचें साह्य झालें, भांडवलदारांचेहि झाले आणि सरकारनेहि अमाप पैसा दिला. पण हे सर्व घटक आधी कार्डोबा या नगरीत होतेच. त्यांना सर्वांना एकत्र आणून कार्यप्रवण केलें तें फादर अल्बिनो यांनी; आणि तें त्यांच्या धर्मभावनेला आवाहन करून.
 युरोपांतील बहुतेक सर्व नगरीत आज लोकांच्या धर्मभावनेला आवाहन करून तेथील धर्मोपदेशक दलितांचा, दीन, दरिद्री, अनाथ, अपंग यांचा उद्धार करीत आहेत. त्यांना प्रतिष्ठित, सुखी, संपन्न जीवनाचा लाभ करून देत आहेत. लंडनमधील एक धर्मोपाध्याय जिमी बटरवर्थ यांचे कार्य असेंच आहे. बाराव्या वर्षापासून गिरणीत बारा-पंधरा तास काम करून आईचें व भावंडांचे पालन- पोषण करणारा हा मुलगा. त्या वयांतच आपण उपाध्याय व्हावें ही आकांक्षा त्याच्या मनांत होती म्हणून तो मेथॉडिस्ट पंथाचा सभासद झाला. विसाव्या वर्षी लंडन नगरीच्या सरहद्दीवरील दीनदलित वस्तींतील एका चर्च मध्ये त्याची नेमणूक झाली. असल्या वस्तीत रस्त्यावर हिंडणारी, भटकणारी, उनाड अशी शेकडो मुलें असतात. त्यांच्या आईबापांचें त्यांच्याकडे लक्ष नसतें. लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो. त्यामुळे हीं मुलें चोऱ्यामाऱ्या, चाकूमारी, दंगली यांतच वाढत असतात आणि त्यांच्यांतूनच पुढे इरसाल गुंड व मवाली निर्माण होतात. हीं जीं रस्त्यावरची मुलें त्यांना सन्मार्गाला लावून प्रतिष्ठित जीवनांत आणावयाचें हें जिमी बटरवर्थ यांचें पहिल्यापासूनच ध्येय होतें. या चर्चमध्ये येतांच प्रथम त्यांनी या मुलांच्यासाठी एक क्लब काढला; पण तो त्या चर्चमध्ये काढला, आणि घरोघर जाऊन त्याचा प्रचार सुरू केला. आमच्या मुलांना रस्त्यावरून घरांत आणण्याचे कार्य एखादा धर्मोपाध्याय करीत असेल तर त्याला आम्ही वाटेल तें साह्य करूं,
 लो. १२