पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७६ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

भगवंताचे नामसंकीर्तन त्यांना कसें ऐकवावयाचें ? प्रथम आपण त्यांच्या अन्नवस्त्राची, घराची सोय करू. आणि मग त्यांना धर्म शिकवू.' असें म्हणून गांवांतील डॉक्टर, इंजिनियर, वकील, व्यापारी इ. प्रमुख वर्गातील नागरिकांना त्यांनी पाचारण केलें. प्रथम अर्थातच मिळावें तसें या लोकांकडून साह्य मिळाले नाही. पण अल्बिनो त्यांच्या धर्मश्रद्धेला सतत आवाहन करीत राहिले. हें धर्मकार्य आहे, ही परमेश्वराची सेवा आहे असा उपदेश ते करीत राहिले. त्याचा परिणाम होऊन लवकरच हे सर्व लोक कामाला लागले. एक हजार घरे बांधण्याचा फादर अल्बिनो यांचा संकल्प होता. तीन वर्षांत पंधराशे घरें बांधून झाली. यांत नवल वाटण्याजोगें कांही नाही. अजूनहि जगांत सर्वत्र धर्मश्रद्धा प्राचीन काळाइतकीच जिवंत आहे. त्या महाशक्तीचा उपयोग दलितांच्या ऐहिक उत्कर्षासाठी, संपत्तीच्या समविभाजनासाठी, लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी करावयाचा, आर्थिक, सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी करावयाचा हें मात्र सर्वत्र घडत नाही. आपल्याकडे आजहि मेहेरबाबा, साईबाबा, नारायणमहाराज, उपासनी महाराज यांच्यावर लोकांची किती भक्ति आहे, त्यांच्यासाठी लोक किती पैसा खर्च करतात हे आपण पाहिले तर लोकांत धर्मभावना किती प्रबल आहे हें ध्यानांत येईल. या भावनेचा ओघ सामाजिक कार्याकडे वळविणारा 'योजक' मात्र येथे दुर्लभ आहे. वैगुण्य आहे तें हें आहे. धर्म हा परमार्थ आहे. धर्म हा वैयक्तिक मोक्ष आहे, धर्म हे परलोकसाधन आहे हाच विचार येथे प्रबळ आहे. वैयक्तिक पुण्याइतकेंच सामाजिक पुण्यहि अत्यंत मोठें धर्मकृत्य आहे हा विचार आपल्या समाजांत अजून दृढमूल होत नाही. ऐहिकाच्या पायावरच परमार्थाची इमारत उभी राहू शकते हा विचार अजून आपल्या मनाची पकड घेत नाही. गेल्या तीनशे वर्षांत युरोपांत जी धर्मक्रान्ति झाली तिचें मात्र स्वरूप असें आहे. फादर अल्बिनो यांचे कार्य हें तिचेंच एक उदाहरण आहे. कार्डोबामध्यें तीन चतुर्थांश लोक दलित होते, अनाथ होते, रंजले गांजले होते. अल्बिनो यांनी स्वतः त्यांना आपलें म्हटलेंच पण नगरीतील वरिष्ठ वर्गातील श्रेष्ठीनाहि तसें म्हणावयास लाविलें. त्यांनी दलितांच्यासाठी अनेक संस्था स्थापिल्या श्रीमंतांकडून जमविलेल्या भांडवलावर सीमेंटचा कारखाना, ट्रकचा व्यवसाय, छापखाना,