पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सहावें : १७५

 युरोपीय मिशनऱ्यांची वर उदाहरणें दिलीं तीं परक्या देशांत जाऊन धर्मप्रचार करणाऱ्यांची दिली. इकडे पूर्वेकडे अशाच लोकांची नांवें आपल्या कानी येतात. पण युरोपच्या इतिहासांत अशा मिशनऱ्यांचाच प्रामुख्याने भरणा आहे असे मुळीच नाही. आपापल्या देशांतल्या दलितांचा उद्धार करण्याचें महान् कार्य आज तीनशे वर्षे ही धर्मप्रेरणा करीत आहे. त्याचीहि कांही उदाहरणें वर दिली आहेत; पण आजच्या घटकेलाहि या निष्ठेने प्रेरित होऊन प्रत्येक देशांत धर्मगुरु केवढें कार्य करीत आहेत हें ध्यानांत यावे म्हणून आणखी कांही उदाहरणें देतों. या धर्मगुरूंच्या कार्याकडेच प्रामुख्याने वाचकांचे लक्ष वेधावें हा ती उदाहरणे देण्यांत हेतु आहे. कारण आपल्या देशांत आपण प्रस्थापित केलेली लोकसत्ता यशस्वी व्हावी यासाठी ध्येयवादी, कार्यक्षम स्त्रीपुरुषांची आपल्याला फार गरज आहे. ही उणीव कशी भरून निघेल याचा मुख्यतः आपण विचार करीत आहों. हिंदुधर्मीयांनी इतर देशांत जाऊन धर्मप्रसार करावा, इतरांचें धर्मांतर घडवून आणावें असें सांगण्याचा किंवा सुचविण्याचाहि हेतु नाही. राष्ट्रनिष्ठेप्रमाणेच धर्मनिष्ठा हीहि उदात्त ध्येयवादाची प्रेरणा माणसाला देते, हें कार्य करण्यास ती आजच्या या विज्ञानयुगांतहि तितकीच समर्थ आहे म्हणून तिची जोपासना आपण केली पाहिजे हें मुख्य प्रतिपाद्य आहे. त्या दृष्टीने पुढील उदाहरणें अत्यंत उद्बोधक ठरतील.
 दक्षिण स्पेनमध्ये कार्डोबा ही विख्यात नगरी आहे. तेथे फादर अल्बिनो यांची १९४५-४६ च्या सुमारास बिशप म्हणून नेमणूक झाली. त्या वेळीं कार्डोबा नगरीला अत्यंत अवकळा आली होती. दोन लाखांपैकी निम्याहून अधिक लोक अत्यंत गलिच्छ घाणेरड्या भागांत राहात. ती घरें पशूंनाहि राहण्यास योग्य नव्हती. रोगराई, गुन्हेगारी आणि अनाचार यांनी ती नगरी सडून गेली होती. भ्रष्टता, लाचलुचपत, सत्तालोभ, हीनस्वार्थ यामुळे नागरिकांना जीवन असह्य झालें होतें. प्रथम फादर अल्बिनो कांही दिवस सर्व नगरीत संचार करीत राहिले. गरिबांचें जिणें, श्रीमंतांचे विलास, त्यांनी निरखून पाहिले आणि मग मनाशी त्यांनी कांही निश्चय केला. फादर फाँट हा एक उत्कृष्ट सहकारी त्यांना मिळाला. त्याला ते म्हणाले, 'अरे, इतक्या दीन, इतक्या गांजलेल्या लोकांपुढे धर्मं प्रवचन कसलें करावयाचें ?