पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७४ : लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान

आहेत. त्यासाठी वाटेल ते कष्ट व यातना सोशीत आहेत, प्रसंगी प्राणांचें बलिदान करीत आहेत. त्यांच्यावर नेहमी एक आक्षेप घेण्यांत येतो की, त्यांची सेवा वाटते तितकी निरक्षेप नाही. ज्या दलितांची ते सेवा करतात त्यांचें धर्मांतर घडावें असा त्यांचा हेतु असतो. असा त्यांचा हेतु असतो यांत शंकाच नाही. तीच त्यांची मूळ प्रेरणा आहे. आणि ज्या उदात्त धर्मावर आपली श्रद्धा आहे त्यांतील तत्त्वांचा प्रसार जगांत करावा असें ध्येय मनुष्याने डोळयांपुढे ठेविलें तर त्यांत आक्षेपार्ह तरी काय आहे ? त्यांत जेव्हा इतर राजकारणी आणि स्वार्थी लोक शिरतात, आणि राजकीय हेतु त्यांच्या कार्यांत प्रभावी ठरू लागतो त्या वेळीं त्यावर आक्षेप घेणें युक्त होईल; इतकेंच नव्हे तर राष्ट्रहिताच्या दृष्टीने तें अवश्यहि आहे. मागील प्रकरणांत राष्ट्रनिष्ठेचा विचार करतांना भारतांतल्या परकी मिशन यांच्या संबंधी याच दृष्टीने मी लिहिलें आहे; धर्म ही निष्ठा मानवाच्या, समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीला आजच्या काळांतहि किती प्रेरक होऊं शकते याचा विचार आपण करीत आहों. धर्मामुळे जी उदात्त ध्येयवादाची, त्यागाची, तपश्चर्येची, जनसेवेची शिकवण मिळते तिला या दृष्टीने महत्त्व आहे. मिशनऱ्यांच्या मनांत स्वार्थ असला तरी तो राष्ट्रीय स्वार्थ आहे, तो स्वार्थ ते जनसेवा करून, मानवाची प्रतिष्ठा वाढवून, दलितांची उन्नति करून साधतात आणि त्यापायी वाटेल तो त्याग करण्यास सिद्ध असतात हे विसरून चालणार नाही. हा स्वार्थच इतका ध्येयवादी आहे की, त्या जातीचा स्वार्थ त्यांच्या शतांश जरी आज भारतीयांच्या अंगी निर्माण झाला तरी आपल्या सर्व योजना यशस्वी होतील. कारण या धर्मप्रेरणेतून राष्ट्रनिष्ठेच्या प्रेरणेप्रमाणेच समाजाला अवश्य ती कर्तबगार व तपोनिष्ठ माणसें निर्माण होत असतात. आज आपल्या सरकारने आखलेल्या योजनांवरचे जे अधिकारी आहेत त्यांना या योजनांतून दीनदलितांचा योगक्षेम सिद्ध व्हावयाचा आहे, या प्राणिमात्राच्या सुखदानासाठी आहेत, रंजल्यागांजल्यासाठी आहेत, आणि म्हणून त्या यशस्वी करणें हें, श्रीतुकाराम, श्रीएकनाथ यांच्या वचनाप्रमाणे, फार मोठे धर्मकार्य आहे असें जर वाटले, अशी श्रद्धा जर त्यांचे ठायीं निर्माण झाली तर समृद्धि भारताच्या पायाशीं धावत येईल यांत शंका नाही.