पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सहावें : १७३

एकनिष्ठेने कशी जोपासना करीत आहेत हें सहज ध्यानांत येते. कोठे अमेरिका, कोठे हिंदुस्थान! अमेरिकेतले जीवन किती संपन्न, सुधारलेलें, सुखी ! भारतांतली जनता किती दीन, दरिद्री, अज्ञानग्रस्त, मोहमूढ ! तिची घरे अस्वच्छ, घाणेरडीं ! अमेरिकेच्या तुलनेने माणसें हेंगाडी, कुरूप ! अंधरूढीच्या प्राबल्यामुळे तीं सर्व हेकट झालेली, दुराग्रही बनलेलीं. अशा या माणसांची सेवा करण्यासाठी तें संपन्न व विलासी जीवन टाकून सर्व आयुष्य खर्ची घालावयाचें, हें चारित्र्य खरोखर असामान्य आहे. डॉ. इडा येथे परत आल्या तेव्हा वेलोरच्या आसपासचे लोक त्यांना घरांत येऊ देण्यासह तयार नव्हते. येऊं दिलें तरी, त्या घरांतल्या बाळंतिणीची सुटका करण्याची गरज त्यांनाच आहे, यांना कांही नाही, असें ते त्यांच्याशी वागत. घरांतल्या बायका विटाळाच्या भीतीने त्यांना कसलीहि मदत करीत नसत. तरीहि इडाबाईंनी आपले सेवाव्रत सोडलें नाही. जीजसचा हाच संदेश आहे अशी त्यांची श्रद्धा होती; आणि रुग्णांना रोगमुक्त करतांना त्या संदेशाची शिकवणहि त्या देत राहिल्या. त्यांच्या सेवेमुळे हळूहळू लोकमत पालटूं लागलें, मग त्यांचे स्वागत होऊं लागलें, त्यांना साह्य मिळू लागले तेव्हा लगेच पुढचे पाऊल टाकून त्यांनी एक वैद्यकीय शाळा व एक रुग्णालय स्थापन केलें. आज वेलोरचें रुग्णालय व विद्यालय यांची जगभर कीर्ति झाली आहे. आणि भारतांतल्या अनेक स्त्रिया व पुरुष- (ज्यांचें जीवन डॉ. इडा स्कडर यांच्या धर्मप्रेरणेच्या अभावी केवळ खातेऱ्यांत गेलें असतें)- मोठ्या प्रतिष्ठेला पोचून, जगांतल्या महाविद्यालयांतून पदव्या घेऊन डॉक्टर होऊन भारताच्या सर्व प्रांतांतील रुग्णालयांत जनतेची सेवा करीत आहेत. त्यांतील अनेक लोक आज ख्रिस्ती झाले आहेत. पण हिंदु धर्म जोपर्यंत ही प्रेरणा देऊं शकत नाही, दीनदलितांच्या ऐहिक उत्कर्षावरच धर्माचा उत्कर्ष अवलंबून आहे हें जोपर्यंत हिंदुसमाज मानीत नाही, हिंदु धर्मांत राहून आपला उत्कर्ष होणार नाही असें जोपर्यंत अस्पृश्य, दीन, दलित, आदिवासी अशा जमातींना वाटत आहे, तोपर्यंत याविषयी कसलीहि तक्रार करण्याचा अधिकार हिंदु समाजाला नाही.
 सुखी, संपन्न, विलासी जीवनाचा त्याग करून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी जगाच्या पाठीवर आज हजारो युरोपीय मिशनरी भ्रमण करीत