पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७२ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

त्यांचे आजोबा १८१९ साली प्रथम हिंदुस्थानांत आले. एका धनाढ्य अमेरिकन वकिलाचा हा मुलगा. स्वतः नामांकित डॉक्टर ! पण बापाचा रोष पत्करून, पुढचें उज्ज्वल भवितव्य सोडून मिशनरी म्हणून तो भारतांत आला तो जीजसचा संदेश जगभर प्रसृत करावा, धर्मप्रसार करावा या एकाच हेतूने त्याचे सातहि मुलगे डॉक्टर होऊन मिशनरी झाले व भारत हीच त्यांनी आपली कर्मभूमि मानली. त्यांतल्या कनिष्ठ मुलाची इडा ही मुलगी. बालपणापासून भारतांतली रोगराई, अज्ञान, दारिद्र्य ती पाहात होती. आठव्या वर्षी ती अमेरिकेत परत गेली. आणि तेथे पंधरा सोळा वर्षे घालविल्यानंतर आपण मिशनरी व्हावयाचे नाही असें तिने ठरविलें. तेवढ्यांत इकडे आई आजारी पडली म्हणून तिला नेण्यासाठी इडा हिंदुस्थानांत आली. त्या वेळी एका रात्री एक तरुण ब्राह्मण तिच्याकडे आला व बाळंतपणांत बायको अडली आहे, तुम्ही मदतीला चला असे तिला विनवू लागला. पण इडा स्वतः वैद्यकांत अनभिज्ञ असल्यामुळे तिने माझ्या वडिलांना तुम्ही न्या, असें त्या ब्राह्मणास सांगितले. त्याला हे ऐकून धक्काच बसला. सनातन ब्राह्मणाच्या घरांत स्त्रीच्या बाळंतपणासाठी पुरुष डॉक्टर! आणि तोहि म्लेंच्छ! त्यापेक्षा बायको मेली तरी चालेल, असें तो म्हणाला, आणि दुर्दैवाने ती खरोखरच मेली. पण तें दुर्देव येथेच थांबलें नाही. त्या एका रात्री आणखी दोन तरुण मुली याच आपत्तींत सापडून मृत्युमुखी पडल्या, आणि त्यामुळे इडाचें भवितव्य बदलले. स्त्री डॉक्टरांच्या अभावी भारतांतील स्त्रिया अशा मृत्युमुखी पडत आहेत हें पाहून या समाजाची सेवा करणें हें आपल्या मिशनरी आजोबांनी व वडिलांनी स्वीकारलेलें व्रत आपणहि स्वीकारावयाचें अशी त्याच रात्रीं तिने प्रतिज्ञा केली. अमेरिकेला परत जातांच तिने वैद्यकीय विद्यालयांत नांव घातलें आणि सहा वर्षे आयुर्विद्येचा अभ्यास करून ती हिंदुस्थानांत परत आली व पुढील पन्नास वर्षे तिने भारतीय स्त्रियांची सेवा केली. त्या सेवेतच परवा तिने देह ठेवला.
 डॉ. इडा स्कडर आणि त्यांचे एकंदर कुटुंब यांचा इतिहास पाहिला म्हणजे धर्म ही केवढी प्रबल शक्ति आहे, व्यक्तीला ध्येयप्रवृत्त करण्यास ती कशी समर्थ आहे आणि आजच्या शास्त्रीय युगांत पाश्चात्य लोक तिची