पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सहावें : १७१

 ऐहिक जीवनाची प्रतिष्ठा, या संसारांतील सुबत्ता हे या धर्मपंथांचे पहिले लक्ष्य असतें. हे धर्मसुधारक जेथे जातील तेथे प्रथम लोकांतील अज्ञान, दारिद्रय, रोगराई यांचें निवारण करण्यासाठी प्रयत्न करतात. यासाठी ते शाळा स्थापन करतात, रुग्णालये उभारतात, आणि संस्था निर्माण करून शेकडो कार्यकर्त्यांना ध्येयवादी बनवून दलितोद्धार करतात. या तऱ्हेचें धर्माचरण भारतांत गेल्या हजार वर्षांत अभावानेच दिसतें. पाश्चात्त्यांच्या धर्मबुद्धीला प्रेरणा देणारा ख्रिस्ती धर्माचा आदिग्रंथ जो बायबल त्याच्याप्रमाणेच येथल्या साधुसंतांनीहि समाजोद्धाराचा उपदेश केला होता हें त्यांच्या ग्रंथावरून सहज दिसून येतें. 'जे का रंजले गांजले, त्यांसि म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा ॥ दया करणें जे पुत्रासि, तेचि दासां आणि दासीं ।' हीं श्रीतुकाराममहाराजांची वचनें प्रसिद्धच आहेत. 'मुख्य पूजेचें आयतन प्राणिमात्रा सुखदान,' 'यथासामर्थ्य यथावित्तें, सुख द्यावें प्राणिमात्रांतें !' 'अन्नवस्त्रदान हा स्वधर्म जाण सर्वांचा॥' हा श्रीएकनाथांचा उपदेश अनेकांच्या नित्यपाठांत आहे. पण या वचनांतून समाजसेवेची प्रेरणा कोणी घेतलीच नाही हें भारताचे मोठे दुर्देव होय. दीन, दरिद्री, रोगी, अनाथ, पतित अशा लोकांची दया येथे कोणाला येत नसे असे नाही. पण त्यांना पैसा दोन पैसे द्यावे, त्यांच्या दुःखाचा कांही तात्पुरता परिहार करावा, यापलीकडे येथे कोणाची धर्म बुद्धि गेलीच नाही. कारण असा धर्म करून स्वतःचा मोक्ष साधावयाचा, वैयक्तिक पुण्याची जोड करावयाची एवढीच आमची दृष्टि होती. पण दलितांचा कायमचा उद्धार करावयाचा, त्यांची पशुअवस्था नष्ट करून त्यांच्या जीवनाला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यावयाची ही धर्मबुद्धि येथे निर्माण झालीच नाही. त्यामुळे ज्या सामाजिक तत्त्वामुळे, बंधनामुळे, रूढीमुळे दैन्य, दारिद्र्य, विषमता, निर्माण होते, मानवाचा अधःपात होतो त्या नष्ट करणें हें जे धर्माचें महान् कार्य तें येथे कोणी केलेंच नाही. याचा अर्थच असा को धर्म ही महाशक्ति भारतांत आज कित्येक शतकें लुप्तावस्थेतच आहे.
 धर्मभावना ही मनुष्याच्या ठायीं समाजसेवेची केवढी उदात्त ध्येयदृष्टि निर्माण करते, हें मिशनऱ्यांची चरित्रे वाचून भारतीयांनी जाणून घेतलें पाहिजे. नुकत्याच दिवंगत झालेल्या श्रीमती इडा स्कडर यांचे उदाहरण पाहा.