पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सहावें : १६९

म्हणतात. राष्ट्रनिष्ठेलाहि राष्ट्रधर्म म्हणून कोणी गौरवितात. सत्य हा धर्म आहे, परोपकार, दया हा धर्म आहे. हे सर्व अर्थ आपापल्या परीने युक्तच आहेत. पण येथे धर्माचा मूळ अर्थच अभिप्रेत आहे. सर्वशक्तिमान्, सर्वसाक्षी, सर्वज्ञ, शरणागतांचा त्राता, विश्वाचा पालनकर्ता असा जो परमेश्वर त्याच्यावरील श्रद्धा, त्याची भक्ति, त्याची उपासना या अर्थाने धर्म शब्द येथे वापरला आहे. हा धर्म ही मानवी समाजांतील एक अत्यंत मोठी प्रेरक शक्ति आहे. या परमेश्वरनिष्ठेसाठी मानवाने आतापर्यंतच्या इतिहासांत वाटेल तो त्याग केला आहे. वाटेल त्या यातना सोसल्या आहेत. या परमेश्वरभक्तीमुळे माणसांनी संसार सोडला आहे, स्वजन-त्याग केला आहे, धनवित्त यांचा मोह सोडला आहे, प्राणहि अर्पण केले आहेत. तेव्हा आत्यंतिक ध्येयवादाला प्रवृत्त करणारी अशी ही प्रेरणा आहे याबद्दल दुमत होणें शक्य नाही. पण आजच्या या शास्त्रीय युगांत, या विसाव्या शतकांत, सध्याच्या बुद्धिवादी जगांत ही परमेश्वरनिष्ठा राष्ट्राच्या ऐहिक उत्कर्षाच्या दृष्टीने कितपत व कशी उपयोगी पडेल याविषयी मात्र बराच वाद होणें शक्य आहे. त्याच प्रश्नाचा आता विचार करावयाचा आहे.
 वर वर्णिलेली धर्मश्रद्धा समाजाच्या ऐहिक उन्नतीला कशी साहाय्यभूत होणार अशी शंका येणें साहजिक आहे. कारण सामान्यतः या धर्मश्रद्धेच्या नांवाशी दोन मोठी वैगुण्यें, दोन मोठे दोष निगडित झालेले असतात. ही धर्मश्रद्धा मनुष्याला संसारविन्मुख करते, ऐहिक प्रपंचाविषयी तिच्यामुळे मनुष्य उदासीन होतो, हा एक दोष; आणि बहुधा ही श्रद्धा सर्वत्र अंधळी आणि त्यामुळेच विज्ञानविरोधी, शब्दप्रामाण्यवादी व दुराग्रही अशी असते, हा दुसर दोष होय. जगाच्या पाठीवरच्या बहुतेक सर्व धर्मांची एके काळीं अशी स्थिति होती यांत शंका नाही. आणि त्यामुळे तेथली धर्मश्रद्धा राष्ट्राच्या प्रगतीला उपकारक तर नव्हेच, पण अनेकदा विघातकहि ठरलेली आहे यांतहि वाद नाही. पण युरोपांत १५-१६ व्या शतकांत ग्रीक विद्येचें जें पुनरुज्जीवन झालें तेव्हापासून तेथील युग पालटले आणि हळूहळू गेल्या तीनचारशे वर्षांत धर्मश्रद्धेतले वरील दोन्ही दोष नष्ट झालेले असून पाश्चात्त्य देशांतली आजची धर्मश्रद्धा ऐहिक उत्कर्षाची एक महाशक्ति होऊन बसली आहे.