पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पांचवें : १६७

उपदेशाने तर मला मरगळच येते. हें सर्वं जाणून, राष्ट्रनिष्ठा या महाशक्तीची इतर राष्ट्रांनी केली तशी, विश्वव्यापक ध्येयवाद सोडून, आपण उपासना केली पाहिजे. तरच या राष्ट्रांत सत्य, अहिंसा कांही प्रमाणांत तरी शिल्लक राहतील.
 सध्या मात्र त्यांचा समूळ नाश करण्याच्या योजनेंत आपण आहों. कारण आपण प्रत्येक क्षेत्रांत मिथ्याचार करीत आहोत. तत्त्वांच्या घोषणेंत अति उदात्तता आणि स्वदेशांतील कारभारांत कमालीची तत्त्वभ्रष्टता असें पावलोपावली आपलें वर्तन दिसतें. राष्ट्रनिष्ठेच्या बाबतींत हा मिथ्याचार कसा चालू आहे तें येथवर दाखविलें. धर्म, लोकशाही, कायद्याचें पालन या तत्त्वांच्या बाबतींत हेंच चालू आहे. आणि त्यामुळे असेच अनर्थ घडत आहेत. त्याचा विचार पुढील प्रकरणांत करावयाचा आहे. सध्या आपण राष्ट्रनिष्ठेपुरता विचार संपवू. प्रारंभी सांगितल्याप्रमाणे मनुष्याला कार्यप्रवृत्त करणारी ही एक महाशक्ति आहे. म्हणून परंपरेंतून दिसून येणारा अहंकार आणि आक्रमकांविषयीचा द्वेष या तिच्या दोन्ही अंगांचा परिपोष आपण केला पाहिजे. तो आपण केला तर आपल्या समाजाला सध्या जी मरगळ आली आहे ती नष्ट होईल. आपल्या अंगीं चैतन्य निर्माण होईल. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नष्ट झालेला ध्येयवाद पुन्हा जागृत होईल आणि मग त्यामुळे आपल्या सर्व योजना सफल होऊन दण्डसत्तेच्या आव्हानाचा स्वीकार करण्यास आपण समर्थ होऊ.

+ + +