पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६६ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

करतात, किंबहुना तेच येथल्या राज्यकारभाराचे मुख्य लक्षण झालें आहे. असें असल्यामुळे येथे सर्वत्र मिथ्याचार चालू आहे. आणि या मिथ्याचारामुळेच आपला नाश होत आहे. आपले तत्त्वज्ञान फार उदात्त आणि आपली करणी अत्यंत हीन, अत्यंत अधम असे नित्य घडत असल्यामुळे इतर देशांनी केवळ राष्ट्रीय स्वार्थाची दृष्टि ठेवून स्वसमाजाचें जें कोटकल्याण करून घेतलें तें भारतीयांना साधतां येत नाही. केवळ आपल्या राष्ट्रीय परंपरेचा अभिमान बाळगणे, त्या अभिमानाने राष्ट्रीय अहंकाराचा पोष करणें, आक्रमकांचा द्वेष समाजांत दृढमूल करून टाकणें, न्याय, सत्य, अहिंसा यांची उपासना केवळ राष्ट्रमर्यादेतच ठेवणें (आणि तीहि हितकारक ठरेल तेव्हाच) मुत्सद्देगिरीने अन्य राष्ट्रांना दूर ठेवणें, त्यांच्यावर कधीहि विश्वास न टाकणें हे धोरण सर्व महत्त्वाकांक्षी राष्ट्रें अवलंबितात. त्याचाच अवलंब आपणहि केला पाहिजे. तिसऱ्या, चवथ्या प्रकरणांत दाखविल्याप्रमाणे आपल्या देशांत चारित्र्य व कर्तृत्व शून्यावर येऊन ठेपले आहे. समाजाचा उत्कर्ष व्हावयाचा तर चारित्र्याचें व सद्गुणांचे संवर्धन आपण केलें पाहिजे. तेंहि याच मार्गाने होईल. जपान, जर्मनी येथे जाऊन आलेले लोक तेथील लोकांची उद्योग-तत्परता, कार्यक्षमता, संघटनाबुद्धि, थोर चारित्र्य, सत्यप्रियता, समाजहितबुद्धि, जबाबदारीची जाणीव इ. गुणांची प्रशंसा करीत असतात. ते गुण त्यांनी याच मार्गाने संपादन केले आहेत. त्यांची राष्ट्रभक्ति, त्यांचे परंपरेचें प्रेम, शत्रुराष्ट्राचा द्वेष, राष्ट्रीय अहंकार या प्रेरणाच त्याच्या बुडाशीं आहेत. आपल्या देशांत आज चाळीस वर्षे महात्माजींसारखा महावीर, बुद्ध, जीजस यांच्या तोलाचा महापुरुष सत्य-अहिंसेचा, शत्रुप्रेमाचा, विश्व- बंधुत्वाचा उपदेश करीत आहे. पण परिणाम मात्र जर्मनी, जपान यांच्या बरोबर उलट झालेला आहे. आपण सर्व सद्गुणांना मुकलों आहों याचें कारण उघड आहे. तीं महान् तत्त्वे, तें अति उच्च ध्येय कर्तृत्वाला प्रेरणा देऊ शकत नाही. माझा देश, माझें राष्ट्र, माझी परंपरा येवढेच मी जाणतो. त्याच्या सुखांत माझें सुख आहे, त्याच्या भक्तींत माझ्या अहंकाराचा उगम आहे, हें माझ्या बुद्धीला आकळू शकतें. म्हणून यांना दुखावणाऱ्या, त्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूच्या द्वेषाने मी वाटेल त्या त्यागाला सिद्ध होतों. तसा विश्वबंधुत्वाने, मानवताप्रेमाने होत नाही. शत्रूवरच्या प्रेमाच्या