पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पांचवें : १६५

असल्याचेंच त्यांच्या मतें हे द्योतक आहे. ही कीर्ति आपल्याला जास्त लोभनीय वाटते. मागे ऋषींच्या आश्रमांतच असें अहिंसक वातावरण असे. आतां काँग्रेसच्या राज्यांत अखिल भारतांत ते पसरलें आहे हा भारतीय संस्कृतीचा फार मोठा विजय आहे! राष्ट्राच्या संरक्षणापेक्षा, सामर्थ्यापेक्षा या विजयाचा लोभ भारतीयांनाच जास्त आहे.
 दण्डसत्तांच्या आक्रमणाला तोंड देण्यास भारत समर्थ व्हावा अशी जर आपली इच्छा असेल तर हा विश्वव्यापक तत्त्वांचा लोभ म्हणजे त्या कीर्तीचा लोभ आपण सोडला पाहिजे. हा फक्त कीर्तीचा लोभ आहे असें म्हणण्याचे कारण असे की, तीं विश्वव्यापक तत्त्वें प्रत्यक्षांत कधी अवतरत नाहीत. साकार होत नाहीत. समाज पौरुषहीन करून टाकण्याचें कार्य मात्र ती करतात. अर्नोल्ड टॉयनबी यांच्या वर उल्लेखिलेल्या व्याख्यानांचा विषय 'विश्वराष्ट्र आणि भारत' असा होता. त्यांत विश्वराष्ट्र घडविण्यांत भारताने फार मोठी कामगिरी केली आहे अशी भारताची त्यांनी स्तुति केली आहे. 'संडे टाइम्स' मध्ये या व्याख्यानांचे परीक्षण करणारा टीकाकार कठोर वास्तववादी असावा असें दिसतें. "या स्तुतीला आपण पात्र आहोंत काय ?" असा नास्तिक प्रश्न त्याने केला आहे. भारतांत ही तत्त्वें सांगितली गेली हे त्याला मान्य आहे. महावीर, बुद्ध, अशोक यांनी आणि अलीकडे महात्माजींनी या उदार, विश्वधर्माचा उपदेश केला हें खरेंच आहे. पण भारतांत, विश्वधर्म लांबच राहिला, केवळ भारताचेंहि ऐक्य घडलें नाही. भिन्न राजघराणी, भिन्न जाति, पंथ, जमाती यांचे नित्य संघर्ष व कत्तली येथे चालू होत्या; आणि महात्माजींच्याहि डोळ्यांदेखत त्यांच्या साठ वर्षांच्या तपःसाधनेनंतर अत्यंत भयानक अशा कत्तली झाल्या. त्या थोर महात्म्याची तत्त्वें प्रत्यक्षांत कधीच आली नाहीत, असें सांगून हा टीकाकार म्हणतो की, गेल्या पन्नास वर्षांचा इतिहास पाहतां टॉयनबी हा एक वेडा स्वप्नवादी वाटू लागतो. (संडे टाइम्स: २७-३-६०).
 दुर्दैव असे की, आपण हें वेडें स्वप्नाळू तत्त्वज्ञान स्वीकारून आज स्वतःचा नाश करून घेत आहोत आणि त्याहून शतपट दुर्दैव असे की, या तत्त्वाचा स्वीकार आपल्या नेत्यांनी प्रामाणिकपणे केलेला नाही. स्वतःच्या देशाच्या कारभारांत सत्य, अहिंसा, न्याय, औदार्य, समता यांची ते पदोपदी अवहेलना