पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६४ : लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान

घेतल्या. आधीचे इंग्रज सेनापति असें करूं नका, यांत भारताला धोका आहे असें परोपरीने सांगत होते. पण न्यायबुद्धीपुढे भारताचे हित आपण गौण लेखीत असल्यामुळे आपण उदार मनाने सैन्य काढून घेतलें, आणि मग तिबेटचा स्वाहाकार शांतपणे पाहात बसलों. परवा चीनने आक्रमण केल्यानंतर 'तुमचें लांगजूच्या पूर्वेचें तामादेम हें लष्करी ठाणे मॅकमोहन रेषेच्या बाहेर आहे' असें भारताला त्यानें सुनावतांच भारताने कसून तपास केला व सत्य ध्यानांत येतांच आपण होऊन तें ठाणें सोडून दिलें. चीन मॅकमोहन रेषा मानीत नाहीच, तरी पण आपण राष्ट्रीय स्वार्थापेक्षा सत्य श्रेष्ठ मानतो, तेव्हा हें ठाणें सोडणें अवश्यच होतें. आणि आता भारताचा कांही प्रदेश न्यायबुद्धीने पाकिस्तानला देऊन टाकावयाचा आहे! त्यासाठी घटना बदलून घेणें अवश्य झाल्यामुळे काँग्रेसनेत्यांनी तेंहि केले आहे. कारण भारत सोडून सर्वांना न्याय देणें हेंच आपले ध्येय आहे. परक्यांवर अविश्वास दाखविणें हाहि आपल्या मतें अन्याय आहे, ती हिंसाच आहे. म्हणून १९५८ च्या जानेवारीत चीनचे लष्करी शिष्टमंडळ भारतांत आलें होतें, त्याला आपण आपली सर्व लष्करी ठाणीं दाखविली. टँक्स्, विमानें, दारूगोळा सर्व कांही हिशेब दिला. त्याचा रोजचा दहा हजारांचा खर्चहि आपण केला, आणि चीनने आपल्यावर आक्रमण केलेलें असतांना, वाटेल ते आरोप चीन भारतावर करीत असतांना, चिनी लष्करी अधिकाऱ्यांना आपले सर्व लष्कर, सर्व सरंजाम आपले संरक्षणमंत्री श्री. कृष्ण मेनन यांनी दाखविला. चीनने भारतावर आक्रमण करून आपल्या सैनिकांची हत्या केली असतांनाहि चीनला यूनोंत स्थान मिळवून देण्याचा आपण जो आग्रह धरला तो याच उदारबुद्धीने होय. चीनने आक्रमण केलें, आपला प्रदेश बळकावला तरी त्याचा द्वेष करणें हें युक्त नव्हे, तें भारतीय संस्कृतींत बसत नाही; आणि भारत सोडून जगांत कोठेहि अन्याय होऊं द्यावयाचा नाही, अत्याचार घडू द्यावयाचा नाही हें आपलें ब्रीद आहे. त्यामुळेच जगांत भारताची कीर्ति झाली आहे. परवा इंग्लंडचे मोठे इतिहासपंडित टॉनयबी येथे व्याख्यानासाठी आले होते. त्यांनी व्याख्यानांत सांगितले की, भारतांतील पशुपक्षी, हिंस्र श्वापदे यांच्या मुद्रा पाश्चात्त्य जगांतल्या श्वापदांपेक्षा निर्भय दिसतात. येथला माणूस जास्त प्रेमळ, जास्त अहिंसावादी, उदार व निरागस