पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६२ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

कारण तो भेकडपणा आहे, आणि स्वतः युद्धसाहित्य सिद्ध करावयाचें नाही कारण आक्रमण होणारच नाही. पंचशीलाचीं तत्त्वें त्रिकालाबाधित आहेत अशी आपली श्रद्धा आहे. खरोखर भारतांतील क्षात्रधर्माची ही हत्या आहे. आश्चर्य असे की, सध्याचें आपलें हें तत्त्वज्ञान गांधीवादांत मुळीच बसत नाही. अन्यायाचा, आक्रमणाचा प्रतिकार केलाच पाहिजे हें महात्माजींचे पहिले तत्व होतें. त्यांच्या सर्व तत्त्वज्ञानाचा तो आदि सिद्धान्त आहे. प्रतिकार शस्त्रबलाने करावयाचा कीं आत्मबलाने म्हणजे सत्याग्रहाने एवढाच प्रश्न मतभेदाचा होता. त्याबाबत त्यांचे मत असें की प्रतिकार सत्याग्रहाने करणें उत्तम, पण तें शक्य नसेल तर शस्त्रबलाने करावा. ते म्हणत की, प्रतिकार- शून्य राहून राष्ट्र पौरुषहीन होण्यापेक्षा हजार वेळां हिंसा झालेली चालेल. या दृष्टीने पाहतां स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एक तर काँग्रेसने सत्याग्रह सेना तयार करण्याच्या मार्गास लागणे अवश्य होते आणि काश्मीर, गोवा, हैदराबाद येथे ती सेना पाठवून प्रतिकार करावयास हवा होता. तिबेटवर आक्रमण झाले तेव्हा हि शांतिसेना तेथे पाठविणें अवश्य होते. कारण शेजाऱ्यावर हल्ला झाला असतांना तटस्थ राहणे हा महात्माजींच्या मतें भेकडपणा होय. आज चीनचें आक्रमण झालेलें पाहतांच लक्षावधि सत्याग्रही नागरिक स्त्री- पुरुष, वृद्धबाल तेथे जाणें अवश्य होते. पण हा मार्ग सध्या आपण अनुसरत नाही. मग राहिला दुसरा मार्ग शस्त्रबलाचा. तो स्वीकारावयाचा असें बारा वर्षांपूर्वी ठरवून तेव्हाच तयारीला लागणें अवश्य होतें. त्यासाठी शस्त्रास्त्रे, रस्ते, वाहतुकीची साधने, औद्योगिक उत्पादन यांच्या तयारीला प्रारंभ करावयास हवा होता. आणि महत्त्वाची तयारी म्हणजे समाजाच्या रागद्वेषाची चेतावणी ही होय. पण वर सांगितल्याप्रमाणे युद्धाच्या दृष्टीने औद्योगिक उत्पादनाचा आपण विचार केला नाही व राष्ट्राला प्रक्षुब्ध करणें हे आपल्याला निषिद्ध असल्यामुळे आपण कोणताच मार्ग अवलंबिलेला नाही. आणि सहा सहा वर्षे परकीय आक्रमण धर्मराजालाहि हेवा वाटावा इतक्या शांततेने आपण पाहात बसलों आहोत. आपलें राष्ट्र सध्या पौरुषहीन झालें आहे, मरगळून गेलें आहे, कर्तव्यशून्य झालें आहे, त्याचें हें कारण आहे. धड शस्त्रवादी नाही व धड गांधीवादीहि नाही असे तृतीयपंथी, भ्रष्ट, तेजोहीन, चैतन्यहीन, स्फूर्तिशून्य तत्त्वज्ञान आपण स्वीकारले आहे.