पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पांचवें : १६१

तरी आक्रमण येणारच ही जाणीव ठेवून युद्धसाधन-संभाराच्या आणि मानसिक प्रवृत्तीच्या दृष्टीनें चीनने तयारी केलेली आहे, आणि स्वातंत्र्य- प्राप्तीनंतर आता युद्ध, लढाई संपली, आपल्यावर कोणी आक्रमण करणार नाही अशा पूर्ण विश्वासाने आपण दोन्ही दृष्टींनी युद्धपराङ्मुख राहिलों. आणि तसेच राहणार असे आपले तत्वज्ञान आहे. विश्वबंधुत्व, शत्रुप्रेम, शांतता, पंचशील या उदात्त तत्त्वांनी पंडित जवाहरलाल इतके मोहून गेले की, चीन आपल्याला दगा देईल असें त्यांच्या स्वप्नांतहि आले नाही. सर्व राजनीतीचें सार म्हणजे अविश्वास, असें महाभारतकार म्हणतात. 'संक्षेपो नीतिशास्त्राणां अविश्वासः परो मतः ।' राजकारणांत कधीहि, कोणावरहि विश्वास ठेवू नये असे तत्वज्ञान आहे; आणि निरागस बालभावाने सर्वांवर विश्वास हें ठेवावा असें आपलें तत्त्वज्ञान आहे, आणि त्यावर आपली इतकी श्रद्धा आहे की, आक्रमण झालेले कळले असूनहि पंचवार्षिक योजनेतील औद्योगिक विकासांत युद्धसामग्रीचा समावेशहि आपण केला नाही. मेजर- जनरल परांजपे आपल्या भाषणांत म्हणतात, "आपल्या एकसारख्या चाललेल्या शांतिपाठामुळे युद्ध हा शब्द उच्चारणेंहि आतापर्यंत पाप होतें. त्यामुळे युद्धाचा देशांतील उद्योगधंद्यांशी संबंध असतो याचाहि सर्वांना विसर पडला होता. त्यामुळे गेल्या दोन पंचवार्षिक योजनांत राष्ट्राची युद्धसंपत्ति वाढविण्यावर जो भर द्यावयास हवा होता तो दिला गेला नाही. संरक्षणदलाच्या काय गरजा आहेत, कोणत्या उद्योगांना प्राधान्य द्यावें, कारखाने कोठे उभारावेत इत्यादि गोष्टींचा विचारहि पहिल्या दोन योजनांच्या आखणीत केला गेला नाही." (केसरी, २०- १२- ५९). चीन आक्रमण करील ही कल्पनाच संभवनीय नसल्यामुळे सरहद्दीवरच्या रस्त्यांच्या बांधणीचा किंवा वाहतुकीच्या साधनांचा विचारसुद्धा भारताने केला नाही. चीनने मात्र तो विचार करून कृतिहि केली. भारताच्या सरहद्दींतच त्याने रस्ते बांधून काढले !
 स्वातंत्र्यप्राप्तीच्या क्षणापासून संरक्षणाची, युद्धाची चीनने तयारी केली तशी आपल्याला करता आली नसती असे नाही; पण तशी करावयाची नाही असे आपले ठरलेले आहे. जनतेत प्रक्षोभ माजूं द्यावयाचा नाही, कारण द्वेषाने कधी कल्याण होत नाही, परराष्ट्राशी लष्करी करार करावयाचा नाही,
 लो. ११