पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पहिलें : ७

अशी कामगारांची प्रारंभी स्थिति होती. त्या वेळी परदेशी भांडवल आणणे अवश्य होते, पण त्यासाठी ऐनजिनसी माल परदेशी पाठवावा लागे. तो माल सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांपासून बंदुकीच्या धाकाने लुटून घेतला. अन्नधान्य, लोणी, कोंबड्या, डुकरें यांनी भरलेल्या गाड्या परदेशाला जात आहेत व सभोवतालच्या परिसरांत हजारो शेतकरी अन्नान्न करीत मरत आहेत असें त्या वेळी नेहमीचें दृश्य होतें (मॉरिस हिंडस 'मदर रशिया'). आज यांत थोडा तरी बदल झाला आहे, पण जेमतेम अन्नवस्त्रापलीकडे कामगारांना तेथे जास्त कांहीच मिळत नाही. जास्त सुखसोयीसाठी ते संप करतील तर तेंहि शक्य नाही. संप म्हणजे जनताद्रोह ! तो सर्वांत मोठा गुन्हा. त्याला देहान्त शिक्षा; त्यामुळे इतर राष्ट्रांत नित्य संपामुळे उत्पादनांत घट होते ती रशियांत होत नाही. कामगाराला एका कारखान्यांतून दुसरीकडे जाण्याचा किंवा नोकरीचा राजीनामा देण्याचाहि हक्क नाही. तसें त्याने केल्यास तो जगांतून नाहीसा होईल. असें सर्व बाजूंनी कराल नियंत्रण ठेवून सोव्हिएट रशियाने गेली चाळीस वर्षे चोवीस तास यंत्रे चालवून व कामगार राबवून लष्करी धन निर्माण केलें आणि त्यामुळेच त्याची संहारशक्ति फार मोठ्या प्रमाणांत वाढली आहे. रशियांत १९२८ सालीं जें पोलाद निघत असे त्याच्या दसपट आज निघते. कोळसाहि दहापट निघतो. पेट्रोल ५ पट व वीज ३४ पट निघते. उलट कापड, पादत्राणें हें जीवनधनदुप्पट व चौपट इतकेंच वाढले आहे. १९५७ सालीं ६ नोव्हेंबरला क्रुश्चेव्ह याने सुप्रीम सोव्हिएटपुढे केलेल्या भाषणांत पुढील १५ वर्षांतील उत्पादनाचा अंदाज सांगितला आहे. त्यांतहि जीवनधनाची वाढ अल्प असून औद्योगिक धनाच्या वाढीवरच सर्व भर दिलेला स्पष्ट दिसतो. या औद्योगिक धनाच्या बाबतींत अमेरिकेला मागे टाकण्याची रशियाची महत्त्वाकांक्षा आहे. हें कितपत शक्य होईल याविषयी शंका आहे. पण आजचा रशियाचा वेग अमेरिकेपेक्षा तिपटीने जास्त आहे हें अमेरिकन लेखकांना मान्य आहे. १९५०-१९५५ या पांच वर्षांत अमेरिकेचें औद्योगिक उत्पादन शे. २५ वाढलें, तर रशियाचें शे. ७० वाढले आहे. ब्रिटनच्या 'आयर्न अँड स्टील बोर्डा'चे एक सभासद रॉबर्ट शोन यांनी रशियाला जाऊन तेथील पोलाद कारखान्यांची पाहणी केली व ब्रिटिश कारखान्यांपेक्षा सोव्हिएट कारखान्यांची