पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

एवढी प्रचंड आहे की, वरील सर्व कत्तलखान व त्यांचे अफाट सेनासागर एकत्र होऊन जरी अंगावर कोळसले तरी नव्यापैकी कोणताहि देश त्यांचा सहज निःपात करूं शकेल. पण सोव्हिएट रशिया वा नवचीन यांचें सामर्थ्यं तशा प्रकारचें नाही. त्यांनी नव्या मूल्यांची उपासना केली नसली तरी नव्या शक्तीची उपासना निश्चित केली आहे; आणि म्हणूनच जगाला त्यांची भीति वाटत आहे.

औद्योगीकरण
 'रशिया इतका बलशाली कसा झाला' या लेखांत जोसेफ व स्टीवर्ट ॲलसॉप या अमेरिकन लेखकांनी रशियाच्या वाढत्या सामर्थ्याचें वर्णन केलें आहे. त्यांनी असे दाखवून दिले आहे की, गेली चाळीस वर्षे रशियाने आपले सर्व बळ औद्योगीकरणावरच खर्च केलें आहे. अन्नधान्य, कपडालत्ता, घरें, पादत्राणें, वाहनें इ. समाजाच्या जीवनाला आवश्यक असें जें धन त्याची वाढ करण्याकडे रशियाने संपूर्ण दुर्लक्ष केले आणि पोलाद, पेट्रोल, कोळसा, वीज, अणुशक्ति, विमानें, तोफा, बाँब, रणगाडे हें जें औद्योगिक व लष्करी धन त्याची वाढ करावयाची असा कृतनिश्चय त्याने केला आणि अजूनहि त्याचे तेच धोरण चालू आहे. सुधारलेल्या देशाचें सर्व सामर्थ्य औद्योगीकरणांत आहे. युद्धाला लागणारे सर्व धन, शस्त्रास्त्रे, अवजारें आणि सर्व प्रकारचे साहित्य औद्योगीकरणांतूनच निर्माण होतें हें जाणून तो एक ध्यास रशियन सत्ताधाऱ्यांनी घेतला आणि त्यासाठी लोकशाही मूल्यांचा, मानवी मूल्यांचा, पूर्ण बळी द्यावा लागला तरी द्यावयाचा असा निर्धार त्यांनी केला; व यमाच्याहिपेक्षा जास्त निर्दयपणा करून तो अंमलांत आणला. रशियन जनता अत्यंत दरिद्री असतांना रशियाला औद्योगिक प्रगति कशी करता आली असें कोणी विचारतात. त्यावर ॲलसॉप म्हणतात की, रशियन जनता दारिद्र्यांत आहे म्हणूनच रशियाला ही प्रगति करता आली. कामगारांना पुरेसे अन्नवस्त्र आहे की नाही, राहायला जागा आहे की नाही, याचा विचारहि तेथील सताधीश करीत नाहीत. त्यामुळे इतर देशांत निर्माण होणारा प्रचंड भांडवलाचा प्रश्न तेथे निर्माण होतच नाही. मजुरी तेथे अत्यंत स्वस्त आहे. अन्नवस्त्र आहे आहे, नाही नाही,