पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६० : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान .

आज चाळीस वर्षे चिनी माणूस सारखा रणांगणांतच उभा असल्यासारखा आहे. तो चिआंग-कै- शेकच्या देशद्रोही फौजांशी लढत आहे, जपानशीं लढत आहे, अमेरिकेशी लढत आहे. या लढ्यांत तो अक्षरशः अग्निदिव्यांतून अनेक वेळा बाहेर आलेला आहे. जपानच्या आक्रमणाच्या वेळी खेडयाखेड्यांत, घराघरांत चिनी माणूस लढत होता. आग, जाळपोळ, लूटमार, कत्तली हा जपान्यांचा नित्याचा खेळ होता. त्यांना तोंड देतां देतां बेडर झालेला, कडवट भावनांचा चित्तांत परिपोष करणारा, सर्व प्रकारच्या युद्धांत निष्णात असलेला, थंडी, वारा, ऊन, पाऊस, उपासमार, यमयातना यांची तमा नसणारा असा चिनी माणूस पोलादाने घडविलेला आहे. शून्याच्या खालच्या थंडीत आणि १२० अंशाच्या वरच्या उन्हांत तो सहज काम करू शकतो. तुफान नद्या ओलांडणे, दऱ्या डोंगर चढणें, गहन अरण्यांत दिवस काढणें याची त्याला खातरजमा नाही. अशा ६५ कोटी चिन्यांशीं आपल्याला लढा करावयाचा आहे, आणि आपण कसे आहोत ? गेल्या शंभर वर्षांत आपण लढाई पाहिलेली नाही. आपल्या सैन्याने पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत मिळून ८/१० वर्षे लढाई देखली आहे, पण ती शिपायांनी आणि तिसऱ्या चवथ्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी. (जनतेने नव्हे.) याच्यावर इंग्रजांनी आपल्याला कधी जाऊं दिलेच नव्हते. युद्धाचें नेतृत्व करणें, योजना आखणे, सर्व व्याप डोळ्यांपुढे ठेवून त्याची चिंता वाहणे, व अनेक आघाड्यांवर युद्ध चालविणें या कर्तृत्वाचा आपल्याला अभ्यासच नाही. शिवाय या सर्वांतून जो कांही अनुभव आला असेल तो फक्त आपल्या शिपायांना आला आहे. जनतेला यांपैकी कशाचाच अनुभव नाही. जनता संग्रामांत उतरली होती ती सत्याग्रह संग्रामांत. त्यांत पुष्कळांना 'अ' वर्ग मिळे, पुष्कळांना 'ब' वर्ग ! त्या वेळी तुरुंगांत दूध पिऊन पुष्कळांची वजनें वाढलींसुद्धा. सामान्य जनतेचे 'क' वर्गांत कांही हाल झाले, पण ते तुरुंगांच्या इमारतींत. अन्नवस्त्र तेथे निश्चित होते. बर्फ नव्हते, आग नव्हती, जाळपोळ नव्हती, कत्तल नव्हती. चिन्यांशीं तुलनेने पाहतां आपण लढाई अनुभवली आहे या म्हणण्याला काडीचाहि अर्थ नाही. अशा या चीनची अद्ययावत् सेना ३० लक्ष आहे, तर आपली ५ लक्ष आहे.
 पण अत्यंत महत्त्वाचा फरक आहे तो असा की, स्वातंत्र्यप्राप्तीच्या क्षणापासून आपल्याला हे स्वातंत्र्य सुखाने कोणी भोगू देणार नाहीं, कोठून