पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पांचवें : १५९

त्या अग्नींत खाक होऊन लोक उत्साहाने राष्ट्रकार्याला लागले असते. आज भारतीयांची शक्ति परस्परांच्या द्वेषांत खर्च होत आहे. तो शत्रुद्वेषाने संघटित झाली असती व आपल्या सर्व योजना सफळ झाल्या असत्या. प्रत्येक देशांत हें घडलें आहे, घडत आहे; पण प्रक्षोभ, शत्रुद्वेष, वैराग्नि हें सर्व भारतीयांना वर्ज्य आहे. आमच्या नेत्यांची शुचितेवर श्रद्धा असल्यामुळे असल्या मार्गाने ते देशांत कदापि चैतन्य निर्माण होऊ देणार नाहीत. मात्र याचा परिणाम एकच होतो. शत्रुद्वेष, आक्रमकांविषयींचें वैर याऐवजी भारतीय जनता परस्परांचा द्वेष, एकमेकांविषयी वैर या भावना जोपाशीत आहे. कर्तृत्वशून्य व पौरुषहीन होत आहे. तिला मरगळ येत आहे. कोणत्याहि कार्याविषयी तिला उत्साह नाही. भारत आणि चीन या आपल्या पुस्तकांत श्री. रा. कृ. पाटील यांनी एक उद्बोधक उदाहरण दिले आहे. पंडितजी एकदा सिंद्री येथील खतांच्या कारखान्याला भेट देण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी तेथील मजुरांना विचारलें की, "तुम्ही येथे कोणासाठी काम करतां?" पंडितजींची अपेक्षा अशी की, राष्ट्रविकास योजनेसाठी, भारतासाठी, समाजकल्याणासाठी आम्ही काम करतों, असें ते म्हणतील. पण त्या मजुरांनी, 'आमच्या कंत्राटदारासाठी आम्ही काम करतो,' असें उत्तर दिलें. चीनमधला सामान्यांतला सामान्य कामगार, बूटपॉलिश करणारा मुलगासुद्धा राष्ट्रकार्याच्या जाणिवेने बोलतो याची अनेक उदाहरणें रा. कृ. पाटील यांनी दिली आहेत; आणि अनेक युरोपीय, व इतर पंडितांनी, प्रवाशांनीहि दिलीं आहेत. ६५ कोटी चिनी जनतेंत एवढी मोठी सामाजिक जाणीव निर्माण करण्यांत तेथील नेत्यांना यश आलें तें कशामुळे? कोणती किमया त्यांनी केली? चीनच्या प्राचीन वैभवाची भक्ति व आक्रमकांचा द्वेष ही ती किमया आहे. या ग्रंथांतील तिसऱ्या प्रकरणांत याचें विवेचन केलें आहे, म्हणून त्याची पुनरुक्ति येथे करीत नाहीं. पण आपणांवर आक्रमण करणाऱ्या दण्डसत्तांचें सामर्थ्य कशांत आहे हें मात्र वाचकांनी ध्यानांत घेणें अवश्य आहे.
 ज्या चीनशी आपला मुकाबला आहे त्याच्या सामर्थ्याचा आपण विचार केला तर प्रत्येक भारतीय चिंतातुर होईल. चीनच्या नेत्यांनी अनेक मार्गांनी, अनेक साधनांनी राजकीय दृष्टीने चीनच्या ६५ कोटी लोकांना प्रबुद्ध करण्यासाठी विश्वप्रयत्न तर केले आहेतच, पण त्याहिपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे