पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान

नेव्हस्की यांच्या नांवाचा ते घोष करूं लागले. राष्ट्रध्वज हें पराक्रमाचें स्फूर्तिस्थान असावयास पाहिजे, आणि स्फूर्ति ही युगायुगांच्या स्मरणांतून, पूजनांतून प्राप्त होत असते. ती पराक्रमांतून, शत्रूच्या संहारांतून येत असते. भारतीयांच्या मनोमंदिरांत अशोकाला तें स्थान नाही. पण आमच्या नेत्यांनी हें जाणले नाही आणि जाणलें असले तरी आपल्या तत्त्वज्ञानाच्या आग्रहापुढे त्यांना या महाशक्तीची पर्वा नाही. श्रीकृष्णाचें सुदर्शन आणि दाशरथीचें धनुष्य यांचे त्यांना वावडें आहे. तेव्हा त्यांच्यापासून जनतेला स्फूर्ति मिळणार असली तरी राष्ट्रध्वजावर त्यांच्या स्मृतीला स्थान मिळणार नाही.
  या सर्वांच्या मागे एक मोठें तत्त्व आहे. संताप, द्वेष, अमर्ष, क्रोध यांपासून आपल्या नेत्यांना भारतीय जनतेला मुक्त करावयाचें आहे. १९५४ सालींच चीनने भारतावर आक्रमण केलेलें आहे, पण पंडितजींनी तें जनतेला कां कळविलें नाही? जनतेंत प्रक्षोभ माजेल म्हणून ! बंगालची फाळणी झाली. तेव्हा तिचा संताप येऊन लोकांत विलक्षण जागृति निर्माण झाली, लोक राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन वाटेल त्या त्यागास सिद्ध झाले. त्या वेळीं लाला लजपतराय म्हणाले की, 'कर्झनसारखे व्हाइसरॉय इंग्रजांनी पुन्हा पुन्हा नेमले तर किती चांगले होईल !' त्यांचा भावार्थ असा की, परक्यांच्या जुलमामुळे, आक्रमणामुळे लोकांत प्रक्षोभ माजतो आणि लोक राष्ट्रसेवेसाठी अवश्य तो त्याग करण्यास सिद्ध होतात. नेमका हाच प्रक्षोभ काँग्रेसच्या नेत्यांना नको आहे. मध्यंतरीं वृत्तपत्रांत कांही लष्करी अधिकाऱ्यांनीहि पत्रें लिहून पंडितजींचा पाठपुरावा केला होता. सर्वांना हीच चिंता आहे, की लोकांच्या भावना आता चेतविल्या जातील कीं काय? द्रौपदीची विटंबना विनाप्रक्षोभ पाहणाऱ्यांची परंपराच या अधिकाऱ्यांनी पुढे चालविली यांत शंका नाही. या वेळी चीनच्या आक्रमणाकडे बोट दाखवून पंडितजींनी राष्ट्राला साद घातली असती तर लोकांची मरगळ नाहीशी होऊन त्यांच्या ठायीं चैतन्य आलें असतें. वास्तविक १९४७-४८ सालापासूनच हें जनताजागृतीचें धोरण अवलंबावयास हवें होतें. काश्मीरवर आक्रमण झालें होतें. गोव्याचा संघर्ष चालू होता. चीनने तिबेट गिळंकृत केला होता. या प्रसंगांनी सावध होऊन आपल्या नेत्यांना जनतेचें राष्ट्रप्रेम धगधगत ठेवतां आलें असतें, आणि मग आपसांतले मत्सर, गटबाजी, दुही, क्षुद्र स्वार्थ, द्वेष हे सर्व