पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पांचवें : १५७

थांबविली असती तर पुढील घोर हिंसा टळली असती, पण मग धर्मराजाला जागतिक कीर्ति मिळाली नसती! आजहि टॉयनबीसारखे पंडित येथे येऊन भारताची जी प्रशंसा करतात तिला आपण मुकलों असतों! राष्ट्रीय स्वार्थापलीकडे भारताला कांही दिसत नाही अशी त्याची जगभर अपकीर्ति झाली असती! त्या सभेंत भीष्म, द्रोण यांनीहि कांही तत्त्वज्ञान सांगून द्रौपदीची विटंबना खुशाल होऊं दिली. वास्तविक स्त्रीची विटंबना थांबविणें हा सर्वश्रेष्ठ धर्म होय. तें सर्वश्रेष्ठ सत्य होय. पण निरनिराळीं तत्त्वें सांगून त्या वेळचे सर्व दळे पुरुष स्वस्थ बसले. विटंबनेचा संताप आला फक्त भगवान् श्रीकृष्णाला. पण त्यामुळेच त्या वास्तववादी, व्यवहारवादी, स्वजनप्रेमी महान् तत्त्ववेत्त्याला, भारताच्या त्या महापुरुषाला आम्ही पद्धतशीरपणें विसरलो आहों, कारण समाजशत्रूंचा संताप भारतीयांना वर्ज्य आहे ! स्वजनहिंसा मात्र वर्ज्य नाही !
 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या राष्ट्रध्वजाचे स्वरूप ठरविण्याची वेळ आली त्या वेळी ज्यांचें पावन नाम हजारो वर्षे भारतीयांच्या कानांत घुमत राहिलें आहे, ज्यांच्या स्मरणाने त्यांच्या वृत्ति उचंबळून येतील त्या राम- कृष्णांचे स्मरण कोणत्याहि काँग्रेस कार्यकर्त्याला झाले नाही. त्यांना आठवला तो सम्राट् अशोक ! कारण तो अहिंसावादी होता, आणि श्रीरामचंद्र, श्रीकृष्ण हे शस्त्रधर होते. शत्रूचा त्यांना संताप येत असे. चीड येत असे. स्त्रियांची विटंबना त्यांना सहन होत नसे, आणि या अमर्षामुळे त्यांनी शत्रूंचा संहार केला. अर्थातच काँग्रेसला त्यांचे नाम वर्ज्यच झाले. पण कोट्यवधि भारतीयांपैकी अशोकाचे स्मरण होतांच ज्यांना स्फुरण चढेल, ज्यांच्या अंगावर रोमांच येतील असे किती आहेत ? ज्या खेड्यापाड्यांत आमच्या नेत्यांना जागृति निर्माण करावयाची आहे, त्यांपैकी किती खेडयांत अशोकाची पूजा होते ? अशोकाचें नांव माहीत असणारे तरी किती आहेत? हजारांत एक लाखांत एक तरी असेल का ? मदर रशिया या पुस्तकांत रशियाच्या दुसऱ्या महायुद्धांतील पराक्रमाविषयी लिहितांना मॉरिस हिडसनने म्हटले आहे की, रशियाचे नेते कार्ल मार्क्सला मानीत. पण हा अज्ञात पुरुष रशियन जनतेला स्फूर्ति देण्यास असमर्थ होता, म्हणून कम्युनिस्टांनी आपल्या ध्वजावरचें त्याचें ध्येयवाक्य काढून टाकले आणि महाराणा पीटर, अलेक्झँडर