पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५६ : लोक सत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

त्याला प्रवृत्त केलें नाही तर तो स्वकीयांची हिंसा करू लागतो. सध्यां भारतांत हेंच चालू आहे. शत्रूशीं अहिंसा व भारतीयांवर रोज तीन वेळां गोळीबार ! पाकिस्तानशीं प्रेमाने वाटाघाटी. त्याने अत्याचार केले, गांवें बळकावलीं तरी प्रेमाने वाटाघाटी ! आणि बेळगांव सीमेवर हिडीस पाशवी अत्याचार, आणि तें करणाऱ्यांना राष्ट्रपतिपदक !
 पण भारताला हा शापच आहे. अतिरेकी, अव्यवहारी सात्त्विकतेच्या, औदार्याच्या बेहोषीने स्वजनांच्या हिताचा नाश करावा आणि त्यांतच श्रेष्ठ धर्म आचरल्याचा अभिमान मिरवावा, अशी वृत्ति जोपासली जाणें हा भारताला शापच आहे. आम्हांला सत्य, औदार्य सुचावयाचें तें परक्याशीं वागतांना. धर्मराजा फासे खेळावयास बसला. भीमाने ठार मारलेल्या राक्षसाच्या हाडाचे फासे केले होते. त्यामुळे भीमाने आरोळी मारली की, पांडवांना अनुकूल दान पडे. त्यावर शकुनीने तक्रार केली. तेव्हा धर्माने भीमाला ओरडण्याची बंदी केली. कारण काय ? कांही नाही. केवळ औदार्य, शत्रुप्रेम ! पुढे कौरवांचें कपट ध्यानांत आल्यावर धर्मराजाने तसे स्वच्छ सांगून खेळ बंद करावयास हवा होता, पण तसें त्याने केलें नाही. कारण वचननिष्ठा ! मनांत विचार असा येतो की द्रौपदीला पणाला लावतांना तिला विवाहांत दिलेल्या 'नातिचरामि' या वचनाने तो बद्ध नव्हता काय ? तिला त्याने पणाला लावली ही केवढी हिंसा आहे! केवढा वचनभंग आहे ! पण त्याच्या यातना स्वकीयांना भोगावयाच्या होत्या. त्याला धर्मराजाची हरकत नव्हती. आमच्या सर्व श्रेष्ठ निष्ठांचा फायदा नेहमी शत्रूलाच मिळावयाचा !. स्वतःच्या स्त्रीच्या बाबतीत धर्मराजाने धर्मद्रोह केला. हिंसाच केली. मग तशीच हिंसा, तसाच वचनभंग तिच्या वस्त्राला दुःशासनाने हात घालतांच पुन्हा करून त्याने ती विटंबना थांबविणें अवश्य होतें. पण ती हिंसा परक्याच्या बाबतींत झाली असती. ती आम्हांला वर्ज्य आहे. पहिली हिंसा स्वजनांच्या बाबतींत होती. तिने जगाला आमचें औदार्य दिसतें. या औदार्यामुळेच पुढे अखिल भारतांतल्या क्षत्रियांचा, १८ अक्षौहिणींचा संहार झाला. मुस्लिम लीगवरील काँग्रेसच्या प्रेमामुळे पाकिस्तान निर्माण होऊन लाखो हिंदवासीयांचा जसा संहार झाला त्याच प्रकारची ही पूर्वावृत्ति होती. त्या वेळी जर धर्मराजाने हिंसा करून, वचननिष्ठा सोडून द्रौपदीची विटंबना