पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पांचवें : १५५

ऐक्य टिकत नाही. काँग्रेसमध्ये सत्ता हेंच प्राप्तव्य आहे. सेवा हो वृत्तिच नाही. काँग्रेससंस्था ही सेवासंस्था म्हणून राहिली नाही. शिस्त व चारित्र्य यांचे मानदंड नाहीसे झाले आहेत. काँग्रेसकार्यकर्त्यांची राष्ट्रनिष्ठा ओसरत चालली आहे. (टाइम्स: २७-११-५९) हें सर्व कशामुळे झालें याचा आपण विचार केला पाहिजे. माझें असें निश्चित मत आहे की, आक्रमक चीनबद्दल जळता द्वेष आपण समाजांत पसरविला असता तर हें हीण सर्व जळून गेलें असतें, आणि लोक त्यागाला सिद्ध झाले असते. त्यांना तळमळ वाटली असती. त्यांच्या ठायीं सेवावृत्ति निर्माण झाली असती. प्रत्येक राष्ट्राच्या नेत्यांनी लोकांच्या या वृत्तीला साद घालून त्यांच्या मनाचें उन्नयन केलें आणि चारित्र्य, कर्तृत्व, राष्ट्रसेवा, अतुल त्याग इ. सद्गुणांची जोपासना समाजाच्या ठायी करून राष्ट्र सामर्थ्यशाली केलें. शत्रूवर प्रेम करण्याचें पाप त्यांनी केलें नाही.
 तें पापच आहे. अत्यंत निंद्य व गर्हणीय असें पाप आहे. कारण लाखांतल्या एकाहि माणसाला तें शक्य नसल्यामुळे तसल्या उपदेशाने समाजांत मिथ्याचार सुरू होतो. ब्रह्मचर्याचा व संन्यासाचा सार्वत्रिक उपदेश केला तर परिणाम काय होतो तें बुद्धधर्मीय विहारांनी व कॅथॉलिक धर्मीय मठांनी जगाला सांगितलें आहे. या विहारांत व मठांत अत्यंत हिडीस व भयानक अत्याचार माजले होते. शत्रूवरील प्रेमाच्या उपदेशाने हेंच होणार आहे, झालें आहे, होत आहे. वैयक्तिक जीवनांत हा उपदेश ठीक आहे, पण राष्ट्रीय जीवनांत असल्या उदात्त तत्त्वांचा उपदेश करणें अत्यंत घातक आहे. सामान्य मानवी जीवनांतून रागद्वेष, स्वार्थ, अहंकार कधीहि नष्ट होणार नाहीत आणि मानवाच्या ठायींच्या त्या मोठया शक्तिच आहेत. त्यांचा सात्त्विकतेच्या प्रेमाने साधुसंतांनी अवमान केला तर समाज पौरुषहीन होतो, निःसत्त्व होतो. म्हणून स्वार्थाला राष्ट्रीय स्वार्थाचें रूप देणे, अहंकाराचें राष्ट्रीय अहंकारांत रूपांतर करणें आणि द्वेष, अमर्ष या शक्तीला सामुदायिक रूप देऊन आक्रमकांविरुद्ध त्या अग्निज्वाळेचा उपयोग करणे हाच समाजाची उन्नति करण्याचा राजमार्ग होय. हें न केलें तर ही ज्वाळा उलटी फिरते व समाजाचा नाश करते. परक्यांचा आक्रमकांचा द्वेष त्याला शिकवला नाही तर तो स्वकीयांचा, आप्तजनांचा द्वेष करू लागतो. आक्रमकांच्या हिंसेला