पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५४ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

ते पोलीस, ते अधिकारी यांची भर घांतली तर काळजाचा ठाव सुटतो. हें सर्व कां व्हावें ? १९४७ पूर्वी अखिल भारतीय जनतेसमोर कांही ध्येय होतें. स्वातंत्र्यप्राप्ति हें तें ध्येय होतें आणि त्यासाठी कांही त्याग करावा, संयम करावा, विवेकाने आपल्या पशुवासना आवराव्या अशा वृत्तीची जोपासना येथे होत होती. आजहि भारतांत ध्येय आहे, राष्ट्रविकास योजना हे कांही सामान्य ध्येय नाही. त्यांत माणसाचा स्वार्थहि आहे, पण एकतर मागल्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे येथले नेते व अधिकारी अत्यंत लोभी, स्वार्थी व केवळ भाडोत्री असल्यामुळे त्या स्वार्थाच्या लाभाची जनतेला खात्री नाही, पण त्यापेक्षाहि महत्त्वाची गोष्ट ही की, हौतात्म्याची प्रेरणा द्यावी असें तें ध्येय नाही. राष्ट्राच्या स्वातंत्र्याचें ध्येयमात्र तसें आहे. राष्ट्रावर आलेल्या आक्रमणाचा प्रतिकार हे ध्येय तसें आहे. त्या प्रतिकाराच्या भावना प्रदीप्त झाल्या की, त्यांतून रागद्वेष चेततात (राग म्हणजे स्वराष्ट्राचें प्रेम आणि द्वेष म्हणजे शत्रुराष्ट्राचा द्वेष). त्यामुळे लोक त्याग, संयम, आत्मबलिदान याला तयार होतात. मग विकासयोजनासाठी कष्टाला ते तयार होतील यांत शंका कसली ?
 चीनने भारतावर १९५४ साली आक्रमण केलें. त्याच वेळी सर्व भारतभर दौरा करून काँग्रेसने चीनविषयीच्या द्वेषाचा वडवानल भारतांत पेटवून द्यावयास हवा होता. त्यामुळे आज मरगळून गेलेले भारतीय जिवंत झाले असते. विकासयोजनांचा व युद्धांत चीनला जो प्रतिकार करावयाचा त्याचा संबंध किती निकट आहे तें हजारो प्रचारकांनी खेडुतांना पटवून दिलें असतें, तर आज त्या योजनांमागे जनता नाही म्हणून आक्रोश करण्याची पाळी आली नसती. आज आपल्या उन्नतीच्या सर्व योजना भाडोत्रीपणे चालल्या आहेत. याची अनेक उदाहरणें, अनेक प्रमाणे मागे दिलींच आहेत. आपले गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी सरकारी अधिकाऱ्यांची सर्वत्र भाडोत्री वृत्ति आहे असें म्हटलें आहे. पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची वृत्ति काय निराळी आहे ? काँग्रेसने नेमलेल्या 'दहांच्या समितीने' जो अहवाल सादर केला तो अगदी निर्णायक व तितकाच उद्बोधक आहे. समिति म्हणते : काँग्रेसच्या कार्यकत्यांना तळमळ अशी नाहीच. कोणत्याहि प्रश्नाचा गांभीर्याने ते विचारच करीत नाहीत. कसलाहि ध्येयवाद नसल्यामुळे त्यांच्यांत