पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पांचवें : १५३

विशाल झाला पाहिजे, अशी त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. 'कोणाही जीवाचा न घडो मत्सर' ' जो खांडावया घाव घाली, कां लावणी जयाने केली, दोघां एकचि साउली, वृक्षु दे जैसा,' हा उपदेश संतांनी परमार्थात केला. तो समाजकारणांत, राजकारणांत, राष्ट्रीय व्यवहारांत आणावयाचा अशी त्यांची प्रतिज्ञा आहे. सत्याने असत्य जिंकावें, अहिंसेने हिंसा जिंकावी हे तत्व राजकारणांतहि प्रभावी झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. यामुळे या देशावर पूर्वीही अनेक वेळां महान् आपत्ति ओढवल्या आहेत, आणि दुर्देवाने आजहि तेंच घडत आहे.
 मुख्य आपत्ति म्हणजे असल्या उपदेशाने समाजाला मरगळ येते. कारण असली श्रेष्ठ ध्येयें, उदात्त तत्त्वें त्याला कळत नाहीत. संतांनी स्त्रीपुत्रांची निदा करून संसाराची किळसवाणी वर्णने करून माणसांच्या सामान्य राग- द्वेषांची उपेक्षा केली. षड्-विकार हे रिपु आहेत असें सांगितले. त्यामुळे संतांना इष्ट तो परमार्थं तर साधला नाहीच, पण येथला माणूस ५०० वर्षेपर्यंत मरगळून कर्तृत्वहीन झाला होता, पण त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे क्षुद्र रागद्वेष नाहीसे झाले नाहीत ते नाहीतच. ते उलट आणखी प्रबळ झाले, आणि मग याचा अत्यंत वाईट परिणाम झाला. तोंडाने उच्च तत्वांचा जप करावयाचा आणि प्रत्यक्ष जीवन खातेऱ्यात घालवावयाचें, दृष्टि तारामंडळाकडे ठेवावयाची आणि उभें शेणांत राहावयाचें, असा कमालीचा मिथ्याचार भारतांत सुरू झाला. पण दुसरें कांही घडणेंच शक्य नाही. मनुष्याच्या जीवनांत पाशवी वासना प्रबळ असतात. त्यांना योग्य वळण लावून, त्यांचें उन्नयन करून त्याला मानव बनविणे एवढेच खरोखर शक्य आहे, पण आपण त्याला देव करण्याच्या प्रयत्नांत नेहमी असतो. त्यामुळे तें तर साधत नाहीच; उलट मानवांतला पशुमात्र उसळून नंगा नाच घालूं लागतो.
 स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या दहाबारा वर्षांचा आपला इतिहास पाहिला तर या भीतिदायक सत्याचा आपल्याला चांगलाच प्रत्यय येईल. तेथल्या नुसत्या विद्यार्थिवर्गाच्या लीला पाहिल्या तरी या भूमींत माणसेंच राहतात काय, अशी कोणालाहि शंका आल्यावांचून राहणार नाही. मग त्याच्या जोडीला म्युनिसिपालिट्यांतले नगरपिते, प्रत्येक वस्तूंत काळाबाजार करून जनतेला हैराण करून टाकणारे व्यापारी, अन्नांत, औषधांत भेसळ करणारे कारखानदार,