पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५२ : लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान

अथवा सामूहिक रीत्या संतापून उठण्याचें सामर्थ्य हें जर राष्ट्रनिष्ठेचें एक लक्षण असेल (आणि तें फार मोठें लक्षण आहे हें या ग्रंथांत अनेक ठिकाणीं सांगितलें आहे.) तर १९१७ साली अमेरिका हे संपूर्ण अर्थाने राष्ट्र झालें असें म्हटलें पाहिजे.
 युद्ध, परराष्ट्राशी संघर्ष, परक्यांच्या द्वेषामुळे, संतापामुळे सामुदायिक उठावणी करण्याचें सामर्थ्य याचे राष्ट्राच्या घडणीच्या दृष्टीने जे महत्त्व आहे तें प्रत्येक राष्ट्राच्या विवेचनांत या ग्रंथांत आवर्जून सांगितलें आहे आणि शेवटी विश्वराष्ट्राचा विचार करतांना तशी विश्वसंघटना होण्याचा संभव नाही असें सांगून त्याचें एक कारण म्हणून बाह्य राष्ट्रसंघर्षाचा अभाव हे दिलें आहे. एका तत्त्ववेत्त्याने तर मंगळ, शुक्र, यांच्याशी दळणवळण सुरू होऊन त्यांच्याशी संघर्ष सुरू होईपर्यंत विश्वराष्ट्र घडणेंच शक्य नाही असें म्हटलें आहे. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. भिन्न धर्म, भिन्न जाती, भिन्न पंथ या सर्वांनी ऐक्य करावयाचें म्हणजे सर्वांनाच मोठा त्याग करावा लागतो, संयम ठेवावा लागतो, कांही अपमान सोसावे लागतात. हे सर्व ते समाज केव्हा करतील ? सर्वांवर प्राणसंकट आलें, सर्वावर आक्रमण झालें, सर्वनाश दिसूं लागला तर. म्हणून त्या वेळीं जी परद्वेषाची भावना निर्माण होते ती समाज जगण्याला अवश्यच असते, आणि अखिल समाजाच्या हितबुद्धींतून ती निर्माण झालेली असल्यामुळे ती अगदी उदात्त व सात्त्विक अशीच असते. खेड्यापाड्यांतल्या, आळीआळीतल्या क्षुद्र स्वार्थापायी जे रागद्वेष निर्माण होतात, म्युनिसिपालिट्यांतल्या भांडणांतून जे किळसवाणे मत्सर व विद्वेष जोपासले जातात त्यापेक्षा अखिल भारताच्या शत्रूविषयीचा जो द्वेष तो कितीतरी सोज्ज्वळ व उदात्त आहे. कारण या द्वेषाला स्वार्थाचा संपर्कहि नसतो. स्वार्थ असला तरी तो राष्ट्रीय स्वार्थ असतो. आणि त्यामुळेच निर्माण झालेले रागद्वेष हे अतिशय उंच पातळीवरचे असतात. सामान्य रागद्वेषांत, वैयक्तिक क्षुद्र स्वार्थात बरबटलेल्या मनुष्याला एवढ्या उंचीवर नेतां आलें तर समाजाचा तो फार मोठा उत्कर्ष आहे, ती फार मोठी प्रगति आहे यांत शंकाच नाही.
 पण भारताच्या नेत्यांचें एवढ्या उंचीवर, या प्रगतीवर, समाधान नाही. सर्व समाजाने वैश्विक उंची गाठली पाहिजे, व्यक्तीचा आत्मा मानवतेइतका