पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पांचवें : १५१

अमेरिकेविषयीच्या द्वेषाची आग सर्व देशभर पसरली आणि त्या आगींत क्षुद्र भेद, जातीय भेदसुद्धा पार जळून गेले. वाटेल त्या त्यागास जपानी सिद्ध झाले, आणि थोड्याच अवधीत त्यांनी आपला देश बलाढ्य, समृद्ध व समर्थ करून टाकला.
 हिंसा, द्वेष यांतून कधी चांगलें निर्माण होत नाही, झालें तरी तें टिकाऊ नसतें, असें सध्याचें काँग्रेसचे तत्त्वज्ञान आहे. पण इतिहासाला तें मंजूर नाही. १८५४ पूर्वी जपानमध्ये मातृभूमीचा अभिमान होताच, पण अमेरिकेच्या द्वेषामुळे त्यांतून स्फुलिंग बाहेर पडले, आणि मग त्यांतून जपानच्या सर्व गुणसंपदेचा उदय झाला. पण जपानचाच काय ? सर्व मानवी संस्कृतीचा इतिहासच असा आहे. ग्रीक, रोमन, युरोपीय, अमेरिकन, भारती, मिसरी- सर्व, सर्व संस्कृतींच्या पायाशी हिंसाच होती. शेकडा ६०-७० जनांना गुलामगिरीत पिचत ठेवल्यावांचून त्या काळांत संस्कृतीचा उदय होणेंच शक्य नव्हते. तरी त्या संस्कृतींनी अमर कार्य केलें आहे. जर्मनी, रशिया, जपान यांचे इतिहासहि तेंच सत्य दर्शवितात.
 जर्मनी, रशिया, जपान हे देश दण्डसत्तेचे, एकतंत्री सत्तेचे पुरस्कर्ते आहेत म्हणून राष्ट्रीय ऐक्यासाठी परक्यांचा द्वेष चेतविणें त्यांना अवश्य आहे असे कोणास वाटेल. पण अमेरिकेच्या इतिहासांतहि हेंच दिसून येतें. (इंग्लंडचे उदाहरण वर दिलेच आहे.) अमेरिका स्वतंत्र होण्याआधी तेथे तेरा वसाहती होत्या, आणि त्यांचे आपसांत नित्य कलह, संघर्ष चालू होते. पण इंग्लिशांनी त्यांच्यावर जुलूम केला. त्याचा संताप येऊन त्या सर्व वसाहती प्रतिकारार्थ एक झाल्या व त्यांतूनच आजच्या महान् अमेरिकन राष्ट्राचा जन्म झाला. पुढे अमेरिकेत येऊन राहिलेल्या भिन्न भिन्न युरोपीय जमातींना पूर्ण अमेरिकन करून टाकून एकसंध समाज निर्माण करण्याचे कार्यहि परराष्ट्रांशी युद्ध, संघर्ष यांमुळेच झालें असें इतिहासवेत्ते सांगतात. अमेरिकेतील यादवी युद्धांतून उत्तर-दक्षिणेत जो दूरीभाव निर्माण झाला होता तो स्पेन अमेरिका युद्धामुळे, म्हणजे दोघांनाहि समान शत्रु निर्माण झाल्यामुळे बराचसा कमी झाला, आणि मग राष्ट्रीय भावनेवर कळस कोणीं चढविला ? तर विड्रो विल्सन यांनी ! हें सांगतांना वरील ग्रंथाचे (नॅशनॅलिझम) लेखक म्हणतात, 'दुसऱ्या राष्ट्राचा सांघिक द्वेष करण्याचें